मुंबई : शनिवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले आणि ठिकठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागले. उपनगरात अनेक ठिकाणी बसची वाहतूक वळवावी लागली. तर शीव, प्रतीक्षानगर परिसरात नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस ध्वनिक्षेपकावरून आवाहन करीत होते.

मुंबईत शनिवारी पडलेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांतील रस्ते पाण्याखाली गेले. जलमय झालेल्या रस्त्यांवर अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांच्या मदतीने तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती. चेंबूर येथील नूर – ए – इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तर पश्चिम उपनगरात पाच ठिकाणी आणि पूर्व उपनगरात एका ठिकाणी बसची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.

प्रतीक्षानगर परिसरातील सगळे रस्ते जलमय झाल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते. पोलिसांची गाडी या परिसरात फिरत होती व ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना आवाहन करण्यात येत होते.

दिवसभर पडलेल्या पावसामुळे पूर्व उपनगरातील साकीनाका, काजू पाडा, कुर्ला, अशोक नगर, छेडानगर, पवई, चेंबूर, भांडूप येथील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. तर पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, गोरेगाव पूर्व आणि दहिसर भागातही पाणी साचले होते. पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा करण्यासाठी पालिकेने ५४७ ठिकाणी उदंचन संच बसवले आहेत.