मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून काही भागात वादळी वारेही वाहत आहे. हवामान विभागाकडून आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील बहुतांश भागात जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची नोंद झाली होती. या दरम्यान मुंबईत सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पावसाची तूट निर्माण झाली असून मागील काही दिवसांपासून उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाड्यातही काहीशी वाढ झाली होती. दरम्यान, शनिवारी संध्याकाळपासून शहर आणि उपनगरातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे.

यात वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, मुलुंड, मध्य मुंबई तसेच पश्चिम उपनगरातील काही भागांचा समावेश आहे. छत्रपत्री शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सखल भागात पाणी साचले असून उपनगरातील काही सखल भागातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मीरा भाईंदर, वसई-विरार परिसरातही पावसाचा जोर असून पालघर जिल्यात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उत्तर कोकणातील काही भागात ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत उद्याही पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकत असून त्यामुळे त्याच्या लगतच्या प्रदेशात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

मात्र, हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे राज्यातील काही भागांना ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस वादळी पावसाचा प्रभाव राज्यातील काही भागांवर राहील, असा अंदाज असून सोमवारीही मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.