विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमानाला काही तासच शिल्लक राहिले असून, पावसानं बाप्पांच्या स्वागतासाठी सरींच्या पायघड्या घातल्या आहेत. मुंबईत पावसाची संततधार कायम असून, बाप्पांच्या स्वागताच्या तयारीसाठी खरेदी करण्याच्या प्लॅनवर काही प्रमाणात पाणी फेरलं आहे. गुरूवारी रात्रीपासून पावसानं जोर धरला असून, शुक्रवारी दुपारी संततधार कायम आहे. पुढील २४ तास पाऊस बरसणार असून, मुंबईकरांची खरेदीसाठी पडण्याच्या बेतात असलेल्या मुंबईकरांची कोंडी झाली आहे.

गणरायाचे उद्या आगमन होत असून, बाप्पांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना पावसानं झोडपून काढलं आहे. मागील काही तासांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम असून, जोर धरलेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या खरेदीला ब्रेक लागला आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दुसरीकडे समुद्राला उधाण येणार असून मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मागील २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

आणखी वाचा- कोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी दीड वाजता समुद्रात मोठ्या लाटा उसळणार आहेत. समुद्रात ४.७४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली असून, सर्तकतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसणार असून, त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातही अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे.