मुंबई : गेल्या तीन दिवसात शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वेसह बेस्टची वाहतूक कोलमडली होती. यंदा मात्र पाण्यात अडकल्याने बेस्टची धाव मंदावली नसली तरी शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने बेस्टच्या वाहतूकीचे तीनतेरा वाजले होते. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसात रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे बेस्टच्या ४०० बस मार्गांना फटका बसला तर बेस्टचे २ कोटीचे उत्पन्न बुडाले.

बेस्ट ही मुंबईकरांची दुसऱ्या क्रमांकाची जीवनवाहिनी आहे. बेस्टने दररोज सुमारे २२ ते २३ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या ताफ्यातील २ हजार ७०० बसमधून दररोज शहरातील ४०० बसमार्गावर बेस्ट धावते. मुंबई आणि उपनगरात शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. शहरात रविवारी आणि सोमवारी पावसाने धुमाकुळ घातला. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत शहरात ३०० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. झाडे रस्त्यावर पडल्याने बेस्टची वाहतूक कोलमडली. झाड हटविण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने बेस्ट प्रशासनाने बस मार्गांमध्ये बदल केला.

साकीनाका, अंधेरी, भांडुप, मुलुंड, कुलाबा, चेंबूर, आणि अँटॉप हिल या परिसरांत झाडे पडल्यामुळे बससेवा विस्कळीत झाली होती. कामानी, शीव, गांधी मार्केट, हिंदमाता, जोगेश्वरी, विद्याविहार आणि कुर्ला येथील काही रस्त्यांवर पाणी भरल्याने बसची वाहतूक वळविण्यात आली होती. पर्यायी मार्गाने बस चालविण्यात आल्याने बस फेऱ्या लांबच्या मार्गाने धावत असल्याने प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लांबला. बस नेहमीच्या मार्गाने येत नसल्याने मधल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, तसेच प्रवासाला जास्त वेळ लागत असल्याने प्रवाशांना बसथांब्यांवर तासनतास ताटकळत राहावे लागले. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

२ कोटीचे उत्पन्न बुडाले

बेस्टला तिकिट विक्रीतून दिवसाला सुमारे २ कोटीचे उत्पन्न मिळते. तीन दिवसात बस मार्गात बदल करण्यात आल्याने बेस्टचे १ कोटी ९० लाखांचे उत्पन्न बुडाले.

दिनांकबदललेले/रद्द बसमार्ग
४ जुलै१५५
५ जुलै१०३
६ जुलै१०४