मुंबई : मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांच्या उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे अनेक विमानांचे आगमन विलंबाने होत आहे. तर काही उड्डाणे रद्द झाली आणि अनेक विमाने अन्य शहरांकडे वळवण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उड्डाणे सरासरी ५० ते ५५ मिनिटांच्या विलंबाने होत आहेत. तर येणाऱ्या विमानांपैकी २० टक्के विमाने उशिराने येत आहेत. खराब हवामानामुळे धावपटटीवर उतरण्यास विमानांना अडचणी येत असल्याने अनेक विमानांना गो राऊंड करण्यात आले आहे. हवाई वाहतुक कोलमडल्याने राज्याच्या विविध भागातून विधिमंडळ अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांना देखील फटका बसला आहे.

नागपूरहून मुंबईत येणारी विमान सेवा पावसामुळे रखडली आहे. दिल्ली आणि मुंबईतील खराब हवामानाचा विमान उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आम्ही हवामानावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांना विनंती आहे की, तुमच्या विमानाची स्थिती (फ्लाइट स्टेटस) जाणून घेत राहा, ” असे इंडिगोने ”एक्स” (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सूत्रांनुसार, या विमानतळावरून दररोज ९८० ते एक हजार विमानांची ये-जा होते. यात दर तासाला सरासरी ४८ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (विमानांचं संचालन) होते. यामध्ये २४ विमानांचे आगमन आणि २४ विमानांचे प्रस्थान यांचा समावेश असतो.

मुंबईत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. तसेच, ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.