मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम असून, दिवसेंदिवस जोर वाढताना दिसत आहे. शनिवारीही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच असून, त्यामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं असून, नागरिकांना जपून प्रवास करावा लागत आहे. शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीचं पाणी सायन आणि कुर्ल्यातील रेल्वे ट्रॅक वर आलं होतं. त्यामुळे दादर ते कुर्ला स्थानकादरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. १२ वाजून ५० मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

मान्सूनचं आगमन झाल्यापासून मुंबई आणि उपनगरांत पावसाची संततधार कोसळत आहे. त्यातच आता शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं असून, याचा फटका लोकल रेल्वे सेवेलाही बसला आहे. सायन-कुर्ला यादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं. त्यामुळे रेल्वेनं या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून १२:१५ पासून लोकल वाहतूक थांबवण्यात आली होती, त्यानंतर १२ वाजून ५० मिनिटांनी सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

पावसाचा जोर वाढलेला असल्याने सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल गाड्या संथगतीने धावत होत्या. दरम्यान, यावेळेत चुनाभट्टी परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे हार्बर लाईनवरील रेल्वे गाड्या मर्यादित वेगाने धावत होत्या. ट्रान्स हार्बर लाईनवरूनही लोकल संथगतीने सुरू असल्याची माहिती मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली होती.

मुंबईत पावसाचं धुमशान सुरूच आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरत आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मुंबईकरांनो, काळजी घ्या… अतिवृष्टीचा इशारा!

हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, नागरिकांनी मोठ्या झाडांखाली उभं राहणं टाळावं तसेच बाहेर पडताना स्वताची काळजी घ्यावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. १३ व १४ जून या कालावधीत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं, असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.