मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून मुंबईतील सखल भाग जलमय झाले आहेत. मुसळधार पाऊसधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने लोकल सेवा विलंबाने धावत होती. तसेच शनिवारी पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा आणि मध्य रेल्वेवरील विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेची लोकल सेवा कूर्मगतीने धावत होती.

हवामान विभागाने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, मुंबई उपनगरांत आणि ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता.. परिणामी, ठिकठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले. संततधारेमुळे अनेक रस्त्यावर दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने येथील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी मिळणे देखील कठीण झाले.

पावसाचा जोर वाढल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला. दुपारच्या सुमारास विक्रोळीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या ठिकाणी वेगमर्यादा लागू करण्यात आली. तर, उर्वरित मार्गावर कोणतीही वेगमर्यादा लागू नव्हती. दुपारी २.३० च्या सुमारास सीएसएमटी ते कल्याण, कर्जत आणि खोपोली दरम्यानची लोकल सेवा धीम्यागतीने धावत होती.

अनेक लोकल दादर – घाटकोपरदरम्यान बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे लोकलमधील महिला, दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांची प्रचंड कुंचबणा झाली. कुर्ला – विद्याविहार, विद्याविहार – घाटकोपर, विक्रोळी – भांडुप, भांडुप – मुलुंड या काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना १५ ते २० मिनिटे घालवावी लागली. त्यातच लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तर, सीएसएमटी – पनवेल, ठाणे – वाशी आणि पनवेल, नेरुळ – उरण लोकल सेवा काही मिनिटे विलंबाने धावत होती.

मेल-एक्स्प्रेसचा खोळंबा

पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावत होत्या. यामुळे काही मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. पश्चिम रेल्वेवरील गाडी क्रमांक ५९०४५ मुंबई सेंट्रल – वापी पॅसेंजर आणि गाडी क्रमांक ५९०४० वापी – मुंबई सेंट्रल पॅसेंजर रद्द करण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड येथे शनिवारी सकाळी ११.५० च्या सुमारास मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला.