मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक मागील आठ ते नऊ तासांपासून ठप्प आहे. लोकलचा बोजवारा उडल्याने हजारो मुंबईकर रेल्वे स्थानकांवर तसेच कार्यालयांमध्ये अडकून पडले आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बंद झालेली वाहतूक रात्री दहा वाजल्यानंतरही सुरु झालेली नाही. त्यामुळेच हजारो कर्मचारी ऑफिसमध्ये अडकून पडले आहेत. तर घरी जाण्यासाठी निघालेले अनेकजण स्थानकांवर अडकून पडले आहेत.

चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, दादर, ठाणे, अंधेरी अशा अनेक स्थानकांमध्ये प्रवासी अडकून पडले आहेत. पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या सोडण्यात येत असल्या तरी त्यासंदर्भात कोणतीही माहिती स्थानकांमध्ये दिली जात नाहीत. एकीकडे स्थानकांमध्ये प्रवासी अडकून पडलेले असतानाच अनेक कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्येच थांबून राहण्याला प्राधान्य दिले आहेत. अनेक ऑफिसेसने रेल्वे बंद असल्याने अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खाण्याची सोय केल्याचे सोशल नेटवर्किंगवरुन दिसून येत आहेत.

सर्वच मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहेत. प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नाहीय. तसेच कोणत्याही पद्धतीची घोषणा रेल्वे स्थानकांवर केली जात नसल्याने प्रवासी हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिकेकडून अडकलेल्या मुंबईकरांसाठी निवाऱ्याची सोय केली आहे. रेल्वे बंद असल्याने आणि पावसात अडकलेल्यांसाठी सिद्धिविनायक मंदिरात जेवण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे. दरम्यान मध्य रेल्वे कधी सुरु होईल सांगू शकत नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एकीकडे सीएसटीएम, चर्चगेट, दादर तसेच ठाणे स्थानकाबाहेर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वे ठप्प असल्याने रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडणारे रस्त्यांवरही अडकून पडले आहेत. मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.