मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर मुलुंड ते कांजूरमार्ग या भागात वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच, अंधेरी सब वेमध्ये दोन फूट पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. खार सब वेदेखील पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर चुनाभट्टी स्टेशन रोड, दादर, कींग्ज सर्कल, व्ही. एन. पुरव मार्ग, चेंबूर, कुर्ला, विलेपार्ले, वांद्रे, बोरिवली, मालाड आदी विविध ठिकाणी पाणी साचल्याने जळजीवन विस्कळीत झाले आहे.

गुरुवारी सायंकाळी काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या २४ तासांत शहर विभागात १२६ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच पूर्व उपनगरात ११०, तर पश्चिम उपनगरात ११४ मिमी पाऊस नोंदला गेला. हवामान विभागाने मुंबईला पुढील ७२ तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधारांनी मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे.

बीकेसी ते शासकीय वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अंधेरी भुयारी मार्ग, मानखुर्द भुयारी मार्ग जलमय झाल्याने ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच, दादर टिटी, हिंदमाता, शीव, अँटॉप हील, दक्षिण मुंबईत पायधुनी डीडी जंक्शन, काळबादेवी या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काणेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागातही पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. विविध रस्त्यांवर झालेल्या वाहतूकोंडीमुळे प्रवशांना ताटकळत प्रवास करावा लागत आहे. एस. व्ही. रोडवर पाणी साचल्यामुळे जोगेश्वरीपासून अंधेरीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.