Mumbai Rains Today Update : हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या असून मुंबई मनपाने अंधेरी सबवे काही काळीसाठी बंद ठेवला आहे. याठिकाणची वाहतूक आता एसव्ही मार्गावर वळविण्यात आली आहे. तसेच बेस्टच्या काही बसगाड्या अन्य मार्गाने वळवाव्या लागल्या आहेत. मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढच्या काही तासांत मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग जिल्ह्यात संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली असून, ही प्रणाली अंतर्गत भागांच्या दिशेने सरकताना दिसणार आहे. त्यामुळे १९ ते २१ जुलै दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपरनगरांसह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरामध्ये भर दिवसा काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळणार आहे. सातारा, कोल्हापूरासह कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावर दृश्यमानतेवर याचे परिणाम होताना दिसून येतील. दरम्यान, या घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह वसई, विरार या भागातही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि डोंबिवली उपनगरातही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेस्टच्या वेळापत्रकात बदल मुंबई तसेच उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने शहर तसेच उपनगरांत जोर धरला आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शीतल सिनेमा मार्गावर पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक ७, ३०२, ३०३,५१७,३२२ मगन नथू राम रोड, काळे मार्गे जुना आगरा रोड कमानी मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच आरे युनिट क्रमांक २२ येथे पाणी साचल्यामुळे. बस क्रमांक ४६०,४८८ व्होई सीप्झ - मरोळ मरोशी - दोन्ही दिशांनी वळविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत शहरात ६६ मिमी, पूर्व उपनगरांत ५३ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ५७ मिमी पावसाची नोंद झाली. आजचा पावसाचा अंदाज अतिवृष्टी रत्नागिरी, चंद्रपूर मुसळधार ते अतिमुसळधारठाणे, रायगड, सिंधुदुर्ग,सातारा, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा मुसळधारमुंबई, पालघर, कोल्हापूर, पुणे वादळी वाऱ्यासह पाऊसधुळे, जळगाव, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ