मुंबईत पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पाण्याचा निचरा होण्यासही वेळ लागत असून, पाणी ओसरण्याआधीच सोमवारी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबर लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रातही पावसाचं पाणी शिरलं असून, मुंबईत कोसळत असलेल्या पावसाबद्दल भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी भीती व्यक्त केली आहे. “मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?”, अशी शंका उपस्थित करत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.

आशिष शेलार यांनी मुंबईत दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधलं आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील जनजीवन कोलमडलं असून, अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. या सगळ्यांसंदर्भात शेलार यांनी ट्वीट करून म्हणणं मांडलं आहे. “मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही. भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले… गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतणाऱ्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?”, अशी भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai Rains Updates: मुंबईतील पाऊस… लोकल रेल्वे सेवा… हवामान विभागाचा इशारा; सर्व ताजे अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

“म्हणून मा. मुख्यमंत्र्यांना विनंती… तातडीने महापालिकेसह लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी… या विषयातील तज्ज्ञांना बोलवावे व त्वरीत आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत. मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?”, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

Mumbai Rains Updates: वातावरणीय बदलांमुळे मुंबईत वादळी पाऊस

भांडुप जलशुद्धीकरण संकुल जलमय; पाणी उकळून प्यावे-पालिकेचे आवाहन

मुंबईत शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला बसला. पावसाचे पाणी साचल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. परिणामी, मुंबईतील बहुतांश भागांत रविवारी पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. शनिवारी रात्रीपासूनच पावसाच्या तांडवाने हवालदिल झालेल्या मुंबईकरांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने रविवारी नव्या समस्येला सामोरे जावे लागले. दरम्यान, युद्धपातळीवर संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करून संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.