नेमेचि येतो पावसाळा प्रमाणेच नेमेचि तुंबते मुंबई असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण अशीच स्थिती पुन्हा एकदा मुंबईत निर्माण झाली आहे. दरवर्षी नालेसफाई आणि पाणी तुंबण्यावरून मुंबई चर्चेचा विषय ठरते. यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबईवर ही स्थिती ओढवली असल्याचं चित्र आहे. मान्सून दाखल होताच पावसाने मुंबईला झोडपून काढलं. त्यामुळे अवघ्या काही तासांत झालेल्या पावसामुळे मुंबई शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तर बेस्ट सेवेलाही फटका बसला आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या एक दिवस आधीच मान्सूननं मुंबईत पाऊल ठेवलं. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिकच वाढला. १४० ते १६० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या पावसाने मुंबईची घडीच विस्कटून टाकली. मुंबईतील अनेक भागांत पाणी भरलं. महापालिकेनं १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला, तरी पहिल्या पावसानेच प्रशासनाच्या दाव्यांवर शंका उपस्थिती केली आहे. मुंबईतील काही दृश्येच याची साक्ष देत आहेत.

संबंधित वृत्तः १०४ टक्के नालेसफाई! मुंबई महापालिकेचा दावा

मालाड सबवे की कालवा?

पहिल्या पावसामुळे ‘मालाड सबवे’ला कालव्याचं रुप आलं होतं. खांद्याइतकं पाणी भरल्यामुळे सबवे वरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. सबवेवर भरलेल्या पाण्यामुळे किती पाऊस झाला याची कल्पना येऊ शकते.

अंधेरी सबवे बंद

मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी भरलं आहे. अंधेरीतील सबवे बंद करण्यात आला आहे. सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

सायनमध्येही पाणीच पाणी

मुंबईतील पाणी साचणाऱ्या भागांपैकी एक असलेल्या सायनमध्येही मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं. त्यामुळे वाहनधारकांना खबरदारी घेत प्रवास करावा लागला.

हेही वाचा- पावसाचं धुमशान, मुंबई तुंबली! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेला ‘ब्रेक’

मुंबईतील गांधी मार्केट परिसर…

जोरदार पावसाने मुंबईकरांची पुन्हा फजिती केली. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर पाणी भरले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्या दाखवण्याचं काम वाहतूक पोलिसांना करावं लागलं. तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मुंबईच्या ‘जीवनवाहिनी’लाही ब्रेक

मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

सोमवारी रात्री पावसाचं आगमन झालं. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. सकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, त्यामुळे रस्त्यावर धुके पसरल्यासारखं दृश्य तयार झालं होतं.