मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू असून तब्बल १६ हजार ५७५ रहिवाशांची पात्रता निश्चिती १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या रहिवाशांची १,६९४ घरे रिकामी करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. ही घरे रिकामी झाल्यानंतर सप्टेंबरपासून पूर्वमूक्त मार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपर छेडानगर आनंदनगर, ठाणे असा विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या प्रकल्पासाठी रमाबाई आंबेडकर नगर येथील १,६९४ घरे बाधित होत होती. त्यामुळे एमएमआरडीएने बाधित घरांसह संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प राबवित आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने १६ हजार ५७५ रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण करून आता परिशिष्ट २ तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. त्यांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता उर्वरित रहिवाशांची पात्रता निश्चिती १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : पावसाळी आजारांबाबत डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

हेही वाचा – मुंबईत पुढील दोन- तीन तास मुसळधार पावसाची शक्यता

जुलैमध्ये निविदा खुल्या

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएने आचारसंहितेआधी मार्चमध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. जुलैमध्ये या निविदा खुल्या करून वास्तूशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करून आराखडा तयार केला जाणार आहे. एकूणच रमाबाई आंबेडकर नगराच्या पुनर्विकासाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे.