मुंबई : मुंबई शहर व उपनगरांतील विविध भागांत आयोजित होणाऱ्या रामलीला कार्यक्रमांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. रामलीला आयोजकांना येणाऱ्या अडचणी व कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक सुविधांबाबत लोढा यांनी बुधवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत आयोजकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत साहित्य कलामंचचे महामंत्री विनय मिश्रा यांनी रामलीला आयोजनादरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्या.

कार्यक्रमांच्या ठिकाणी फिरते शौचालय, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. मुंबईतील विविध भागांत आयोजित होणारे हे कार्यक्रम उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडावेत, यासाठी आयोजकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन याप्रकरणी सहकार्य करण्याचे आश्वासन अश्विनी भिडे यांनी दिल्याने रामलीला मंडळांना दिलासा मिळेल, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

रामलीला कार्यक्रमांच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था, तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी (फॉगिंग) करण्यासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन अश्विनी भिडे यांनी दिले. महापालिका प्रशासनाच्या सहकार्यामुळे मुंबईतील रामलीला कार्यक्रमांचे आयोजन अधिक सुरळीतपणे करता येणार असून कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.