मुंबईतून पळून गेलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील २६ वर्षीय आरोपीला बिहारमधील दरभंगा येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपीने बिहारमधल्या एका केशकर्तनालयात केलेल्या ५० रुपयांच्या यूपीआय पेमेंटद्वारे पोलिसांनी त्याला शोधून काढलं. लग्नाच्या बहाण्याने त्याने एका २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिलेला भेटला होता. त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी मुंबईतून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला बिहारमधून पकडून आणलं. तो दरभंगा येथे त्याच्या बहिणीच्या घरी राहत होता.
एका २५ वर्षीय महिलेने दक्षिण मुंबई
पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा दाखल केल्यानंतर लगेचच आमची टीम आरोपीच्या मुंबईतल्या घरी दाखल झाली. परंतु त्याआधीच तो फरार झाला होता. त्याचा फोनही बंद होता त्यामुळे आम्ही त्याचं लोकेशन ट्रेस करू शकलो नाही, त्यानंतर पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स मिळवले. कॉल डिटेल्सद्वारे त्याची ओळख, त्याच्या नातेवाईकांची नावं आणि त्यांचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला.
हा आरोपी बिहारचा असून त्याची बहीण सध्या दरभंगामध्ये राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जवळच्याच एका गावात त्याची आई राहत असल्याचेही पोलिसांना समजलं. दरभंगा हे ठिकाण नेपाळच्या सीनेनजिक असल्याने पोलिसांना आधी संशय होता की, तो कदाचित नेपाळला पळून गेला असेल. परंतु तो दरभंगा येथेच होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ११ मे रोजी पोलिसांचं एक पथक दरभंगा येथे पाठवलं.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलीस सर्वप्रथम आरोपीच्या बहिणीच्या पत्त्यावर दरभंगा येथे गेले. परंतु पोलीस घराबाहेरच्या परिसरातच थांबले ते घरात गेले नाहीत. कारण पोलीस आपल्या शोधात इथवर पोहोचलेत हे आरोपीला समजलं असतं तर तो पळून गेला असता. पोलिसांचं पथक आरोपीच्या बहिणीच्या घराबाहेर गस्त घालत होतं. त्याच वेळी मुंबईतल्या एका हवालदाराला संशयिताच्या बँक खात्यातून नुकतंच एक यूपीआय पेमेंट झाल्याची माहिती मिळाली. दरभंगा येथील एका सलूनमध्ये त्याने ५० रुपयांचं पेमेंट केलं होतं.
हे ही वाचा >> “…मस्तवाल मुलाचा बाप”, केंद्रीय मंत्र्याच्या शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर
यूपीआय पेमेंटमुळे आरोपीला शोधणं सोपं झालं
सलूनचा यूपीआय आयडी मिळाल्यावर लगेच डिजीटल पेमेंट कंपनीकडून सलूनचं नाव, नंबर आणि पत्ता पोलिसांनी मिळवला. तसेच पोलिसांनी सलून चालकाशी संपर्क साधला. हे सलून आरोपीच्या बहिणीच्या घरापासून केवळ ५० मीटर अंतरावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलूनच्या दिशेने धाव घेतली. सलून चालकाला आरोपीचा फोटो दाखवला. आरोपीची माहिती मिळवून त्याच रात्री पोलिसांनी आरोपीच्या बहिणीच्या घरी धाड मारली. आरोपी घरातच होता. पोलिसांनी आरोपीला तिथेच बेड्या ठोकून मुंबईला आणलं. त्याने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला असून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.