मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडी रेकनर) तयार करताना प्रत्यक्ष बाजारस्थिती आणि विविध भागधारकांच्या सूचना विचारात घेऊन अधिक वास्तववादी व पारदर्शक करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने जिओ वर्ल्ड येथे विकासक, वास्तुविशारद व अभियंत्यांसोबत आढावा बैठक घेतली. वार्षिक मूल्यदर तयार करण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच संबंधित घटकांना सहभागी करून अधिक पारदर्शक आणि वास्तवदर्शी मूल्यदर तक्ते तयार करण्यावर विभागाचा भर असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. वार्षिक मूल्यदर तयार करताना विकासक व वास्तुविशारदांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करण्यात येणार असून, नागरिकांशी संवाद आणि सहभाग वाढवण्यावरही भर दिला जात आहे.

या प्रक्रियेत भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञानाचा वापर करून वार्षिक मूल्यदरांशी संबंधित माहिती नकाशावर मांडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबईची विकास योजना या नकाशावर अध्यारोपित करून विविध भागांची माहिती अधिक स्पष्टपणे पाहता यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यामुळे मूल्यदर तयार करताना परिसराचे स्वरूप आणि उपलब्ध माहितीचा अधिक नेमकेपणाने विचार करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या बैठकीत मुंबई शहर व उपनगरातील वार्षिक मूल्यदर तयार करण्याची पद्धत नगररचना (मूल्यांकन) मुंबई प्रदेश उपसंचालक संग्राम कानडे यांनी सादरीकरणाद्वारे स्पष्ट केली. उपस्थितांनी मांडलेल्या शंकांचे निरसन सहसंचालक ( नगररचना, पुणे) किशोर गोखले यांनी केले. सध्याच्या रेडी रेकनरबाबत सूचना किंवा सुधारणा असल्यास त्या संघटनांमार्फत लेखी स्वरूपात विभागाकडे सादर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. वांद्रे कुर्ला संकुलातील सह जिल्हा निबंधक कार्यालय ‘मॉडेल ऑफिस’ म्हणून विकसित करण्यात आले असून, तेथे नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील नोंदणी कार्यालये अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्यावर विभागाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत भारतीय स्थावर मालमत्ता विकासक संघटनांचा महासंघ (क्रेडाई) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण उद्योग चेंबरचे (एमसीएचआय) अध्यक्ष सुखराज नहार व सचिव ऋषी मेहता, राष्ट्रीय स्थावर संपदा परिषदेचे (नरेडको) अध्यक्ष कमलेश ठाकूर तसेच नरेडको नेक्स्टजेनचे अध्यक्ष रौनक बांदेलकर, वास्तुविशारद व नगर नियोजक संघटनेचे (पीईएटीए) अध्यक्ष संदीप इसोरे, बृहन्मुंबई विकासक संघटना (बीडीए), आणि कार्यरत अभियंते हजर होते.