मुंबई : मुंबईतील निवासी स्थावर मालमत्तांची सातत्यपूर्ण घोडदौड कायम असून सप्टेंबर महिन्यात १२ हजार ६२२ मालमत्तांची नोंदणी झाली. सप्टेंबर महिन्यात गेल्या १४ वर्षांत पहिल्यांदाच घरनोंदणीचा उच्चांक नोंदला गेला आहे. गणेशोत्सवाच्या (१४ ते २५ सप्टेंबर) काळात झालेल्या घरखरेदीमुळे या वाढीला मोठा वेग मिळाला. या १२ दिवसांच्या काळात तब्बल पाच हजार ३७९ घर नोंदणी (वर्षानुवर्षे २२ टक्के वाढ) झाली असून यामुळे राज्याच्या तिजोरीत मुद्रांक शुल्कापोटी ६४० कोटींचा महसूल जमा झाला आहे.
मालमत्ता सल्लागार संस्था ‘नाईट फ्रँक इंडिया’ने ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. , ग्राहकांचा कायम असलेला विश्वास, मजबूत आर्थिक पाया आणि उपनगरांतील महत्त्वाच्या मायक्रो-मार्केटमध्ये दर्जेदार गृहप्रकल्पांची असलेली मोठी मागणी यांमुळे सणासुदीच्या काळात घरखरेदीचा हा उत्साह कायम आहे, असे नाईट फ्रॅंकने अहवालात नमूद केले आहे.
सप्टेंबरमध्ये मालमत्ता नोंदणीत १२ हजार ६०० घरनोंदणीचा टप्पा ओलांडणे आणि गेल्या १४ वर्षांहून अधिक काळातील या महिन्यातील सर्वोच्च नोंदणी होणे, हे मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारातील मागणी आणि ग्राहकांच्या उच्च विश्वासाचे स्पष्ट प्रतीक आहे. गणेशोत्सवातील उत्साहामुळे या वाढीला मोठी गती मिळाली. विकासकांमार्फत होत असलेल्या पायाभूत सुविधांमधील सुधारणा, उत्तम दळणवळण आणि स्थिर आर्थिक पाया या घटकांमुळे येणाऱ्या नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या काळात हा उत्साह आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे, असे मत नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष कमलेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
सप्टेंबरमधील घरनोंदणीची आकडेवारी ही प्रत्यक्ष राहण्यासाठी घर घेणाऱ्या आणि आपली जीवनशैली अधिक उन्नत करू इच्छिणाऱ्या ग्राहकांमुळे परिपक्व झालेल्या बाजाराचे दर्शन घडवते. ज्या महिन्यात सहसा व्यवहारांचा वेग बदलता असतो, अशा महिन्यात मोठ्या संख्येने घर नोंदणी होणे, हे बाजाराचा कल दर्शवते. उत्तम रचना, आधुनिक सुविधा आणि वेळेत ताबा देणाऱ्या प्रीमिअम व मध्यम स्वरूपाच्या गृहप्रकल्पांना खरेदीदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे, असे मत सुपर्ब रिअल्टीचे व्यवस्थापकीय संचालक शिल्पिन तातेर यांनी व्यक्त केले.
मालमत्ता नोंदणीचा हा उच्चांक म्हणजे जीवनशैलीतील सुधारणा, उत्तम जोडलेली उपनगरीय मायक्रो-मार्केट्स आणि दर्जेदार राहणीमानासाठीच्या जागांवर खरेदीदारांचा असलेला भर दर्शवतो. पायाभूत सुविधांची जोड आणि विकासकांची विश्वासार्हता असेल तर खरेदीदारांचा विचार लगेचच प्रत्यक्ष खरेदीत रूपांतरित होतो. मुंबईत पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासाचा वेळ कमी होत असल्याने घरनोंदणी वाढेल, असा विश्वास ट्रान्सकॉन डेव्हलपर्सच्या संचालक श्रद्धा केडिया-अग्रवाल यांनी व्यक्त केला.
केवळ गणेशोत्सवाच्या अल्प कालावधीत अधिक घर नोंदणी होणे हे बाजाराची पायाभूत स्थिती किती मजबूत आहे हे सिद्ध करते. खरेदीदार मूल्य, पारदर्शकता आणि सर्वोत्तम लोकेशनचा फायदा देणाऱ्या विश्वासू विकासकांकडे आकर्षित होत आहेत. उर्वरित तिमाहीत खरेदीदारांचा हा सकारात्मक दृष्टिकोन आणखी वाढेल असा विश्वास आहे, असे अरिहा ग्रुपचे प्रमोटर ध्रुमन शाह यांनी सांगितले.
