scorecardresearch

सलग दुसऱ्यांदा मुंबईला ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान; जगातील वृक्षसंपदा समृद्ध शहरांमध्ये समावेश

मुंबईला २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्ष नगरी २०२२’  बहुमान प्रदान करण्यात आला आहे.

mumbai recognised as a tree city of the world for the second time in a row
वृक्षसंपदा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान मिळाला आहे.  ‘जागतिक वृक्ष नगरी २०२२’ या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना ( फूड ॲण्ड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन) ही संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे, तसेच भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे. मागील सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या ‘आर्बर डे फाउंडेशन’ या अमेरिकास्थित संस्थेने आजवर तब्बल ३५ कोटींहून अधिक झाडे लावली आहेत. एवढेच नव्हे तर २०२७ पर्यंत जगभरात मिळून ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे या फाउंडेशनचे उद्दीष्ट्य आहे.

हेही वाचा >>> मुंबई : पत्रकाराच्या मारहाणप्रकरणी तक्रार रद्द, अभिनेता सलमान खान याला उच्च न्यायालयाचा दिलासा

या दोन्ही संस्था २०१९ मध्ये एकत्र आल्या. त्यांनी जगभरात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली. वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे, यासाठी जगभरात कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत, याचाही सदर मोहिमेत शोध घेवून त्यावर सतत संशोधन केले जाते. या निकषांच्या आधारे शहरांची जागतिक वृक्षनगरी यादी घोषित करून त्यांना गौरविण्यात येते. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ पासून हा बहुमान सुरू करण्यात आला आहे.

मुंबईला २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्ष नगरी २०२२’  बहुमान प्रदान करण्यात आला आहे. आर्बर डे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी  डॅन लॅम्बे व अन्न आणि कृषी संघटनेच्या वने विभागाचे सहायक संचालक  हिरोटो मित्सुगी यांच्या स्वाक्षरीनिशी या बहुमानाचे प्रमाणपत्र महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> आरे कारशेडसंदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी  एमएमआरसीचे तीन कोटी ८१ लाख रुपये खर्च

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मागील दोन वर्षात विविध उपक्रम राबवून वृक्ष संवर्धन व नागरी वनीकरणाला चालना दिली आहे. या योगदानामुळे मुंबईला हा सन्मान मिळाला आहे, असे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी  जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. हा बहुमान प्राप्त करताना मुंबईने पाच मानांकनाची पूर्तता केली आहे. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे, अशी ही महत्त्वाची पाच मानांकने आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 12:30 IST

संबंधित बातम्या