मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता सलग सातव्या दिवशी ‘खराब’ श्रेणीत नोंदवली गेली. मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक शुक्रवारी १६४ इतका होता. तर, वांद्रे-कुर्ला संकुल, देवनार, माझगाव , वरळी आणि कुलाबा या भागात प्रदुषणाची पातळी सर्वाधिक नोंदली गेली. येथील हवा ‘अतिवाईट’ ते ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली.
तापमानातील घट, धूलीकणांचे प्रमाण आणि बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ यामुळे गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी खराब हवेची नोंद झाली. याचबरोबर वांद्रे – कुर्ला संकुल येथे शुक्रवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक ३०२ इतका होता. तर देवनार, माझगाव, नेव्ही नगर कुलाबा, सिद्धार्थ नगर वरळी आणि शीव येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २४४, २२४, २४७, २७८ आणि २४१ इतका होता. याचबरोबर बोरिवली येथे १४९, चेंबूर १७९, घाटकोपर १७७, कांदिवली १४१, कुर्ला १०९, मुलुंड १२३, शिवाजीनगर १९५ आणि विलेपार्ले येथे १०८ इतका हवा निर्देशांक होता. म्हणजेच येथे ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली.
हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) हवेची गुणवत्ता ठरते. ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो. राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकानुसार एक्यूआयची स्थिती ०-१०० असल्यास ‘चांगली’ ते ‘समाधानकारक’, १०१-२०० असल्यास ‘सामान्य’, २०१-३०० ‘वाईट’, ३०२-४०० ‘अत्यंत वाईट’, ४०० पेक्षा जास्त असल्यास धोक्याची पातळी ओलांडली असून चिंताजनक परिस्थिती असते.
गेल्या काही दिवसांतील मुंबईतील हवा निर्देशांक कंसात
७ नोव्हेंबर – १५७ (मध्यम)
८ नोव्हेंबर – १०४ (मध्यम)
९ नोव्हेंबर – १०९ (मध्यम)
१० नोव्हेंबर – १२८ (मध्यम)
११ नोव्हेंबर – १५८ (मध्यम)
१२ नोव्हेंबर – १३० (मध्यम)
१३ नोव्हेंबर – १४३ (मध्यम)
१४ नोव्हेंबर – १६४ (मध्यम)
प्रदूषण आटोक्यात कसे आणता येईल ?
मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. परिणामी, मुंबईतील बांधकामांतून माती, सिमेंटचे कण मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात. तसेच वाहने, कारखान्यांमधून येणारा धूर व रसायनांमुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. बांधकामाच्या वेळा निश्चित करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन होते का याची खात्री करण्याची आवश्यकता असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
काय काळजी घ्यावी ?
प्रदुषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे विकार, तर त्वचेची ॲलर्जी, त्वचा कोरडी होणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर जाणे टाळावे. घरा बाहेर जाताना मुखपट्टीचा वापर करावा.
