मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. तसेच, ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
मुंबईला अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचाही तडाखा बसला आहे. दिवसभरात ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना रविवारी घडल्या. शहरात रविवारी तब्बल ११६ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या. तसेच पूर्व उपनगरात ८२, तर पश्चिम उपनगरात ८४ अशा एकूण २०३ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या. तसेच, रविवारी एकाच दिवसात मुंबईत आठ जणांचा बळी गेला. त्यानंतर आज म्हणजेच ६ जुलै रोजी देखील हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करत आहेत. आजही सोसाट्याचे वारे वाहात आहेत. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी असण्याची शक्यता आहे.
घराबाहेर पडणे टाळा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी करू नयेत. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाने मुंबईकरांना केल्या आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
