मुंबई : ना.म.जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरु आहेत. पहिल्या टप्प्याअंतर्गत तिन्ही ठिकाणची ३६६६ घरांची कामे प्रगतीपथावर असून यातील १४३८ घरांची कामे पूर्ण झाली आहेत. या घरांचा ताबा फेब्रुवारीअखेरीस रहिवाशांना दिला जाणार आहे. त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्येही घरांचे चावी वाटप केले जाणार असून एप्रिलपर्यंत ३६६६ बीडीडीवासियांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. पुनर्विकासाअंतर्गत या तिन्ही ठिाकणी पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींची कामे सुरु आहेत. २०२५ मध्ये वरळीतील ५५६ घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्यात आला आहे. बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत नव्या ५०० चौ. फुटाच्या घरात, उत्तुंग इमारतीत रहाण्यास जाण्याचे रहिवाशांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर इतर रहिवाशांना ५०० चौ. फुटाच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. तेव्हा वरळीतील ५५६ रहिवाशांपाठोपाठ आता आणखी ३६६६ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण या तिन्ही ठिकाणची पहिल्या टप्प्यात ३६६६ घरांची कामे वेगात सुरु आहेत. यापैकी नायगावमधील ८६४ आणि वरळीतील ५७४ घरांचे काम पूर्ण झाले आहे.
नायगावमधील ८६४ घरांसाठी निवासी दाखलाही प्राप्त झाला असून घरांचा ताबा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच देणे अपेक्षित होते. मात्र आधी तांत्रिक कारणाने आणि त्यानंतर पालिका आचारसंहितेमुळे चावी वाटप कार्यक्रम रखडल्याने ताबा अडकला आहे. पण फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यातपर्यंत चावी वाटपाचा कार्यक्रम मार्गी लावण्याचा प्रयत्न मुंबई मंडळाचा आहे.
नायगावमधील ८६४ घरांचा ताबा फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत देण्याचे नियोजन आहेच. पण त्याचवेळी एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्यात एकूण ३६६६ घरांची वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. फेब्रुवारीत वरळीतील ५७४ घरांचा तर नायगावमधील ८६४ घरांचा ताबा देण्यात येणार आहे. तर मार्चमध्ये वरळीतील ८५४ घरांचा तर नायगावमधील ५३७ घरांचा ताबा दिला जाणार आहे. एप्रिलमध्ये वरळीतील २८० घरांचा तर ना.म.जोशी मार्ग येथील ५५७ घरांचा ताबा एप्रिलमध्ये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतरही पुढे या तिन्ही प्रकल्पातील पुनर्वसित घरांची कामे जसजशी पूर्ण होतील तसतसा घरांचा ताबा दिला जाणार असून २०२९ पर्यंत बीडीडीवासियांचे पुनर्वसन पूर्ण करण्याचे नियोजन मंडळाचे आहे.
| प्रकल्पाचे नाव | फेब्रुवारी | मार्च | एप्रिल | एकूण |
| वरळी | ५७४ | ८६४ | २८० | १७०८ |
| नायगाव | ८६४ | २३७ | – | १४०१ |
| ना.म.जोशी मार्ग | – | – | ५५७ | ५५७ |
| एकूण | – | – | – | ३६६६ |

