Guillain Barre Syndrome Mumbai Death Case Update नायर रुग्णालयामध्ये ५३ वर्षीय व्यक्तीचा गुइलेन-बॅरे सिंड्रोमने (जीबीएस) मृत्यू झाला. मुंबईमधील जीबीएसचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती २८ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. वडाळा येथे राहणारी ५३ वर्षीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात कक्ष सेवक म्हणून कार्यरत होती. त्यांना ताप येत असल्याने २८ जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील पाण्यासह विविध तपासण्या केल्यानंतर त्यांना जीबीएसची लागण झाल्याचे लक्षात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. मात्र सोमवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

दरम्यान,  जीबीएसची लागण झाल्यामुळे एका १६ वर्षांच्या मुलीला नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र तिची प्रकृती ठीक असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मुलगी पालघर जिल्ह्यातून उपचारासाठी आली असून, ती इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अंधेरी (प.) येथील मालपा डोंगरी परिसरात वास्तव्यास असलेल्या ६४ वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याने ५ फेब्रुवारी रोजी अंधेरीतील मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. राज्यामध्ये आतापर्यंत एकूण १९७ संशयित रुग्ण सापडले असून, त्यापैकी १७२ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे.

आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू जीबीएसने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३ जणांचा संशयित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. राज्यात सापडलेल्या संशयित रुग्णांपैकी पुण्यामध्ये १३२ रुग्ण असून, पिंपरी चिंचवड महानगरपाालिकेच्या हद्दीत २९, पुणे ग्रामीण भागात २८, तर अन्य जिल्ह्यांमध्ये आठ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १०४ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. ५० रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असून, २० रुग्णांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. राज्यात सापडलेल्या रुग्णांमध्ये ० ते ९ वयोगटातील २३ रुग्ण, १० ते १९ वयोगटातील २३ रुग्ण, २० ते २९ वयोगटातील ४२ रुग्ण, ३० ते ३९ वयोगटात २३ रुग्ण, ४० ते ४९ वयोगटात २७ रुग्ण, ५० ते ५९ वयोगटात २८ रुग्ण, ६० ते ६९ वयोगटात २१ रुग्ण, ७० ते ८९ वयोगटात १० व्यक्तींचा समावेश आहे.

Story img Loader