scorecardresearch

मुंबईत बाधितांची एकूण संख्या १० लाखांवर ; रुग्णसंख्येतील घट कायम

मुंबईत तिसरी लाट वेगाने ओसरत असून सोमवारीही रुग्णसंख्येतील घट कायम राहिली आहे.

मुंबई : मुंबईत सध्या करोनाची तिसरी लाट सुरू असून आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १० लाखांच्याही वर गेली आहे, तर मृतांची संख्या १६,४६९  झाली आहे. 

मुंबईत तिसरी लाट वेगाने ओसरत असून सोमवारीही रुग्णसंख्येतील घट कायम राहिली आहे. सोमवारी शहरात ५,९५६ रुग्ण नव्याने आढळले आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होत असून सोमवारी बाधित झालेल्या रुग्णांपैकी ४७९ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील ४५ रुग्णांना प्राणवायू लावावा लागला आहे. तसेच करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असून सोमवारी १५,५५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. परिणामी रुग्णालयात दाखल असणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येतही घट होत असून आता केवळ १५ टक्के खाटा भरलेल्या असून उर्वरित सुमारे ८५ टक्के खाटा रिक्त आहेत.

मार्च २०२० पासून मुंबईत सुरू झालेल्या करोना साथीच्या लाटेमध्ये आत्तापर्यत १० लाख ५ हजार ८१८ जण बाधित झाले आहेत. आत्तापर्यत १६ हजार ४६९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आत्तापर्यंत सुमारे १ कोटी ४६ लाख चाचण्या केल्या गेल्या आहेत.

मृतांच्या संख्येत मात्र वाढ 

मुंबईत रुग्णसंख्या कमी असली तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ होत असून सोमवारी शहरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जण ६० वर्षांवरील होते, तर नऊ जणांना दीर्घकालीन आजार होते.

राज्य : ३१,१११ नवे रुग्ण

मुंबई : रविवारी चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्या कमी असली तरी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यातील रुग्णसंख्या घटली आहे. दिवसभरात राज्यात ३१,१११ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, २४ जणांचा मृत्यू झाला.  गेल्या २४ तासांत नाशिक जिल्हा १५००, नगर ५६३, पुणे शहर ३९७१, उर्वरित पुणे जिल्हा १३५८, पिंपरी-चिंचवड २२६९, सातारा ७४१, औरंगाबाद शहर ३४४, नागपूर शहर २०२३ नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या २ लाख ६७ हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत.  ओमायक्रॉनचे १२२ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्यात सर्वाधिक ४० हे पुणे शहरातील आहेत.

ठाणे : जिल्ह्यात ४,५८३ नवे बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी ४, ५८३ नवे करोनाबाधित आढळून आले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. ठाणे शहर १,३७१, नवी मुंबई १,१४१, कल्याण-डोंबिवली ७०६, मिरा- भाईंदर ५०४, ठाणे ग्रामीण ३३९, उल्हासनगर २०४, अंबरनाथ १२७, बदलापूर १२३ आणि भिवंडीमध्ये ६८ करोना रुग्ण आढळून आले. कल्याण-डोंबिवली तीन, नवी मुंबई, उल्हासनगर आणि मिरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai reports 5956 new covid cases in 24 hours zws