विविध मागण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने निवासी डॉक्टरांनी गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र सामूहिक रजा घेऊन रुग्णांना वेठीला धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या निवासी डॉक्टरांचा एक दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे.
सुधारित विद्यावेतन मिळावे यासाठी ‘मार्ड’ संघटना गेले सहा महिने वैद्यकीय शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार करीत आहे. पण निधीचे कारण पुढे करून शासन चालढकल करीत आहे. त्यामुळे अखेर ‘मार्ड’ने गुरूवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम होऊ नये, म्हणून वरिष्ठ डॉक्टरांना तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असेही एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण संचालकासोबत होणाऱ्या बैठकीत एक दिवसाचा पगार कापू येऊ नये, अशी मागणी करणार असल्याचे ‘मार्ड’चे सरचिटणीस डॉ. शिवकुमार कोल्हे यांनी सांगितले. इतर राज्यातील निवासी डॉक्टरांना मिळणारे वेतन आणि महाराष्ट्रात मिळणाऱ्या वेतनात मोठी तफावत असल्याने आणि आमच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे कोल्हे म्हणाले.
दरम्यान, निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू असतानाही केईएम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आलेल्या २,७७८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ४० रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच ३५ मोठय़ा व ४७ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या़  
त्याशिवाय १३ प्रसुती, १५ जणांना डायलिसिस आणि दोघांच्या पार्थिवाचे शवविच्छेदनही करण्यात आले. नायर रुग्णालयातही सहा प्रसुती आणि दोन रुग्णांवर अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तसेच ४० रुग्णांना भरती करण्यात आले. शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर १६ मोठय़ा, ७ लहान शस्त्रक्रिया, ११ प्रसुती पार पडल्या, अशी माहिती रुग्णालयांच्या सूत्रांनी दिली.
जे. जे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये २,८९८ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच दिवसभरात ५९ रुग्णांना भरती करण्यात आले.