मुंबई : मुलुंड परिसरात नवीन कबुतरखाना सुरू करण्यास मुलुंडमधील रहिवाशांनी विरोध केला आहे. मुलुंड पूर्व येथील जुना ऐरोली – मुलुंड चेक नाका परिसरातील खाडीजवळील जागेत तात्पुरता कबुतरखाना सुरू करण्यास नागरिकांचा विरोध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी महापालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने मुंबईत चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यात मुलुंड पूर्व येथील जागेचाही समावेश आहे. मात्र या निर्णयावर ॲड. देवरे यांनी आक्षेप घेतला आहे. हरकत नोंदवणारे पत्र त्यांनी महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.
ऐरोली – मुलुंड लिंक रोड हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. येथे कबुतरांना खुराक देण्याचे ठिकाण निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात पक्षी गोळा होतील, ज्यामुळे कबुतरांचे थवे त्यांची अचानक उड्डाणे, तसेच रस्त्याच्या कडेने खाद्य देण्यासाठी जमलेले लोक यांच्या उपस्थितीमुळे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी, अपघाताचा धोका वाढेल, असे मत देवरे यांनी मांडले आहे.महापालिका प्रशासनाने या ठिकाणाचा पुनर्विचार करून मुख्य रस्ते आणि घनदाट मानवी वस्तीपासून दूर असलेल्या, खरोखरच एकांत असलेल्या ठिकाणांचा शोध घ्यावा, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार नाही, अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मुलुंडकरांच्या आरोग्यालाही धोका
कबुतरांची विष्ठा आणि पिसे ही आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे मानवाला श्वसनविकार आणि बुरशीजन्य संसर्गांचा धोका निर्माण होतो. सार्वजनिक खुल्या जागेत मर्यादित वेळेसाठी जरी कबुतरांना खाद्य दिले तरी कालांतराने आसपासच्या परिसरात हे आरोग्यधोके पसरू शकतात, असेही या पत्रात म्हटले आहे.
स्वच्छता कशी राखणार
नवीन कबुतरखाने स्वयंसेवी संस्थांनी व्यवस्थापित करावेत अशी अट असली तरी खुल्या व सहज उपलब्ध जागेत सततची स्वच्छता राखणे, तसेच सकाळी ७ ते ९ या ठरवलेल्या वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यंत कठीण असून प्रभावीपणे देखरेख करणे अवघड होईल, असाही मुद्दा ॲड. देवरे यांनी उपस्थित केला आहे.
या चार ठिकाणी नवीन कबुतरखाने
मुंबई महापालिकेने वरळी जलाशय परिसर, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड जवळचा खारफुटी परिसर आणि जुना ऐरोली – मुलुंड जकात नाका, तसेच बोरिवली पश्चिम येथील गोराई मैदान या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. या चारही ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना ‘नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी असेल, असा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
