मुंबई : मराठी भाषा शिकण्यासाठी परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा उत्साह वाढता असला तरी त्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभर वाहन चालवून रोजची उपजीविका सांभाळायची आणि त्यानंतर मराठी भाषेच्या प्रशिक्षण वर्गांना उपस्थित राहायचे, अशा दुहेरी जबाबदाऱ्या अनेक चालक पार पाडत आहेत. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत असला तरी प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी मराठी शिकणे आवश्यक असल्याची भावना चालक व्यक्त करत आहेत.

सध्या अनेक चालक दिवसभर वाहन चालवून वेळात वेळ काढून मराठीच्या वर्गांना उपस्थित राहत आहेत. वर्गासाठी काही तास वाहन बंद ठेवावे लागत असल्याने त्यांच्या रोजच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट होत आहे. प्रशिक्षणात मराठीतील दैनंदिन संभाषण, प्रवाशांशी संवाद, शासकीय व्यवहारातील भाषा तसेच मूलभूत वाचन-लेखन यावर भर दिला जात असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

या उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन प्रशिक्षणाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे १०० ते १५० चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील विविध भागांत आणखी १० ते १२ नवीन वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक चालकांना मराठी शिकता येणार आहे.

मराठी भाषिक चालकच प्रशिक्षक

मुंबईतील विविध भागात मराठी भाषा वर्गांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथून मुंबईत आलेल्या चालकांनी मराठी शिकण्यात विशेष उत्सुकता दाखवली आहे. काही ठिकाणी मराठी भाषिक चालकच प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

मुंबईत सुमारे चार लाख रिक्षा-टॅक्सी परवाने असून दोन पाळ्यांमध्ये जवळपास आठ लाख चालक कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी सध्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. पावसामुळे वर्ग घेण्यात येणाऱ्या अडचणी, प्रशिक्षणासाठी जागा व सभागृहाचा खर्च आणि मर्यादित प्रशिक्षण क्षमता यामुळे प्रशासनाने मराठी शिकण्यासाठी दिलेली १५ ऑगस्टची मुदत वाढवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एका तुकडीत केवळ ५० चालकांना प्रशिक्षण

मुंबई उपनगरांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार रिक्षा कार्यरत असून, त्यापैकी सुमारे ८० टक्के चालक अमराठी भाषिक आहेत. एका तुकडीत केवळ ५० चालकांना प्रशिक्षण देता येत असल्याने सर्व चालकांना वेळेत प्रशिक्षण देणे कठीण झाले आहे. अनेकां उत्पन्नावर परिणाम होत आहे. काही चालक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत असल्याने प्रक्रिया आणखी लांबते. या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्टऐवजी २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केली आहे. सध्या मुंबईत २० ते २५ हजारांहून अधिक चालकांनी मराठीचे धडे घेण्यास सुरुवात केली आहे.

रिक्षांचा तुटवडा, प्रवाशांचे हाल रिक्षाचालक मराठी शिकण्यास तयार आहेत आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, उपलब्ध प्रशिक्षण केंद्रे अपुरी पडत आहेत. कामाचा वेळ सांभाळून वर्ग पूर्ण करणे कठीण जात असल्याने १५ ऑगस्टची मुदत वाढवण्यात यावी. मुदतवाढ न दिल्यास रस्त्यांवर रिक्षांचा तुटवडा निर्माण होऊन प्रवाशांचे हाल होतील. त्याचा फटका चालक आणि प्रवासी दोघांनाही बसू शकतो. – शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन

नवीन वर्गांचे नियोजन चालकांचा या उपक्रमाला कोणताही विरोध नाही. सर्वांची मराठी शिकण्याची इच्छा आहे. मात्र, पावसामुळे वर्ग घेण्यातील अडचणी, जागेचा प्रश्न आणि चालकांची मोठी संख्या लक्षात घेता १५ ऑगस्टची मुदत अपुरी आहे. त्यामुळे २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. येत्या शनिवार-रविवारपासून मोठ्या प्रमाणावर १० ते १२ नवीन वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. – के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप टॅक्सी रिक्षा आघाडी सेल