मुंबई– मुंबईत मार्च १९९३ रोजी उसळलेल्या जातीय दंगलीतील एका फरार आरोपीला वडाळा पोलीस ठाण्याने तब्बल ३२ वर्षांनी अटक केली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली होती. त्यानंतर १९९३ मध्ये मुंबईत जातीय दंगली उसळल्या होत्या. त्या दंगलीतील एक आरोपी आरीफ अली हशमुल्ला खान (सध्या वय ५४) याच्यावर वडाळा पोलीस ठाण्यात कलम १४१, १४३, १४५, १४६, १४७, १४९, १५० तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्याचा पोलिसांनी कसून शोध घेतला होता. तो ओळख लपवून पोलिसांना गुंगारा देत होता.
दरम्यान, बंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जुन्या प्रकरणातील फरार आरोपींंचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार नव्याने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. वडाळा पोलिसांनी आरोपी आरीफ खान याच्या उत्तरप्रदेश येथील मूळ गावी जाऊन शोध घेतला होता. तेथून पोलिसांना काही प्राथमिक माहिती मिळाली होती. त्या आधारे तांत्रिक तपास केला असता आरोपी मुंबईच्या ॲण्टॉप हिल येथील झोपडपट्टी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली आहे.
पोलीस पथकाला बक्षिस
या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या पथकाने केला. कसलाही दुवा नसताना आरोपीला ३२ वर्षानंतर शोधून काढल्याबद्दल वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाला पोलीस उपायुक्तांनी बक्षिस देऊन गौरवले आहे.