मुंबई : पावसाळ्यादरम्यान रस्त्यांवर खड्डे आढळल्यास ते बुजविण्याची कार्यवाही लवकरात – लवकर करता यावी, यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून नागरिकांना आता खड्डेविषयक तक्रार सुलभ पद्धतीने नोंदवता येणार आहे. पालिकेतर्फे खड्डे व दुरूस्तीयोग्य रस्त्यांबाबत पारंपरिक पद्धतीने लेखी, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रार नोंदवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्यात आली आहे. दूरध्वनी, व्हॉट्सॲप, मोबाइल ॲप आदी समाजमाध्यमांद्वारे तक्रार करणे शक्य होणार आहे. तक्रार केल्यानंतर साधारणपणे २४ तासांच्या आत संबंधित अभियंत्यांनी तसेच, कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजवावे, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुंबईतील नागरिकांची पावसाळ्यात गैरसोय होवू नये यासाठी खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पूर्वीच दिले आहेत. तसेच रस्त्यांची सुरू असलेली कामे १० जूनपर्यंत पूर्ण करून वाहतूक योग्य स्थितीत आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या सर्व कार्यवाहीचा बांगर सातत्याने आढावा घेत आहेत. नागरिक, लोकप्रतिनिधी, समाजमाध्यमाद्वारे सादर होणाऱ्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा व्हावा, यासाठी बांगर यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

नागरिकांना दूरध्वनी, व्हॉटस्ॲप आणि समाजमाध्यमांद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदविता येईल. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारी २४ तासांत निकाली काढण्यात येतील. संबंधित तक्रार निकाली निघाली का, किती वेळात निकाली निघते, प्रलंबित असेल तर कधीपासून प्रलंबित आहे, निकाली निघालेल्या तक्रारींबाबत तक्रारदाराचा ‘फीडबॅक’ काय आहे, तक्रार निकाली निघाल्याबद्दल तक्रारदार समाधानी आहे का, हे पाहण्यासाठी इंटिग्रेटेड डॅशबोर्ड विकसित केला जात आहे, अशी माहिती बांगर यांनी दिली.

MyBMC Pothole FixIt या ॲपचा वापर सुलभ व्हावा, यादृष्टीने बदल केले जात आहेत. तक्रार सादर करताना कमीत कमी वेळ खर्च व्हावा, केवळ मोबाइल क्रमांकाच्या आधारावर तक्रार करता यावी, यादृष्टीने पद्धती विकसित केली जात आहे. तक्रार नोंदविल्यानंतर जेव्हा खड्डा भरला जाईल, त्यावेळी संदेश पाठवून तक्रारकर्त्याला त्याची माहिती महापालिकेकडून दिली जाईल, असेही बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला दहा वर्षे पूर्ण, आतापर्यंत ९७ कोटी प्रवाशांनी केला प्रवास

रस्त्यांची परिस्थिती पावसाळ्यादरम्यान चांगली रहावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे हाती घेऊन रस्त्यांची डागडुजी केली आहे. मात्र, तरीही पावसाळ्यादरम्यान खड्डे पडल्यास विनाविलंब दुरुस्त व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी स्वतःहून खड्डे शोधून काढून ते २४ तासात बुजविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले.

१९१६ वर तक्रार नोंदविता येणार

महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या खड्डेविषयक किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्यांविषयक तक्रार १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल. हा दूरध्वनी क्रमांक २४ तास अव्याहतपणे कार्यरत असतो. तसेच, महानगरपालिकेच्या @mybmc या समाजमाध्यमांवरील ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटला टॅग करूनही नागरिक खड्डेविषयक तक्रार नोंदवू शकतात.