मुंबई : खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मुंबईतील सुमारे ७३ टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित काही रस्ते मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील तर काही रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्ते खरोखरच खड्डेमुक्त झाले की नाही हे पुढील वर्षीच्या पावसाळ्यातच कळू शकेल.
खड्डेमुक्त मुंबईची महत्त्वाकांक्षी घोषणा करून मुंबई महानगरपालिकेने २०२३ मध्ये रस्त्यांसाठी महानिविदा काढल्या होत्या. तब्बल १२ हजार कोटींची रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे दोन टप्प्यात हाती घेण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केेले जात आहे.
मात्र गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने कॉंक्रीटीकरणाच्या तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या होत्या. दोन टप्प्यात ही कामे सुरू आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे जाने २०२३ मध्ये सुरू झाली तर दुसऱ्या टप्प्यातील कामे ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाली. ही कामे अजूनही सुरू असून डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्टय ठेवण्यात आले आहे.
रस्ता ही एक महत्त्वाची पायाभूत व दृश्यमान सुविधा आहे. मुंबईत सुमारे २११८ किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. या एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मुंबई महापालिकेवर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून या शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्यामुळे मुंबई महापालिकेवर टीका होत होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला होता.
टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली होती. त्यामुळे मुंबईतील १३०० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले होते. उरलेल्या ७०० किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले होते. त्यापैकी ३४२ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील एकूण १५६६ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.
टप्पा एक मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा १ मे २०२६ पर्यंत आणि टप्पा २ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य असल्याचे पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पीय अंदाजात जाहीर केले आहे.
कोणत्या कामांची काय स्थिती
शहर भागात
रामनाथ गोएंका रोड व गायन सम्राट उस्ताद अजमत रोड, गिरगावातील आर एस सप्रे मार्ग, भायखळ्यातील अब्बासी मार्ग, वडाळातील जामे जमशेद मार्ग ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
पश्चिम उपनगरात
बोरिवलीतील लिंक रोड व त्यावरील संगमस्थाने, सुमेर नगर येथील मुख्य रस्ता, चारकोप सेक्टर ९ मधील रस्ते, मालवणी नाला येथील लगून रोड या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
पूर्व उनपनगर
पी सोमाणी मार्ग व विक्रोळी पूर्व येथील स्लीप रोड, नाहूर पश्चिम येथील फोर्टीस रुग्णालयाजवळील रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अदयाप प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, शहर भागातील रस्त्यांच्या कामांना आधीच उशिरा सुरूवात झाल्यामुळे ही कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. उपनगरातील कामे यावर्षाअखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उपनगरांच्या तुलनेत शहर भागातील रस्त्यांच्या कामांची गती कमी आहे.

