मुंबई : मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात आरटीओने सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे अमराठी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाई, परवाना किंवा (अनुज्ञाप्ती) परमिट निलंबित होण्याच्या धास्तीने अनेक चालकांनी तात्पुरते रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर उतरवणे बंद केले असून, काहींनी दुसरा रोजगार शोधण्यास सुरुवात केली आहे, तर काही जण मूळ गावी परतल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईसह राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) विशेष पथकांकडून गुरुवारपासून चालकांच्या व्यवहारिक मराठीची चाचणी घेतली जात आहे. ”मीटर चालू करा”, ”कुठे जायचे?”, ”बसा”, ”हळू चालवा”, ”ऑनलाइन पेमेंट आहे”, ”एवढे रुपये झाले” अशा दैनंदिन व्यवहारातील साध्या संवादावर चालकांची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, अनेक चालक या चाचणीत अपयशी ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील कारवाईत मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईत १,१४४ चालकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अनेक चालकांनी भीतीपोटी वाहने रस्त्यावर न आणण्याचा निर्णय घेतल्याने शहरात रिक्षा-टॅक्सीची उपलब्धता कमी होण्याची आणि प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका नोटिशीनंतर भीतीचा परिणाम
एका चालकाला नोटीस मिळाल्याची माहिती इतर चालकांमध्ये वेगाने पसरत असल्याने कारवाईची भीती आणखी वाढली आहे. तीन महिन्यांसाठी परवाना किंवा परमिट निलंबित झाल्यास वाहनांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न चालकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे काही जणांनी काही काळासाठी गावी जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
राज्यभरात ७७७ जणांवर कारवाई
आरटीओच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी राज्यभरात ५,२११ चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७७७ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या. मुंबई महानगर क्षेत्रात ३,९४२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७२२ चालकांकडे व्यवहारिक मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळले. म्हणजेच तपासणी झालेल्या चालकांपैकी सुमारे १८.३ टक्के चालकांना नोटिसा देण्यात आल्या.
प्रशिक्षणालाही सकारात्मक प्रतिसाद
आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने अमराठी चालकांसाठी मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. त्यामुळे विशेषतः हिंदी भाषिक चालकांमध्ये मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न वाढत आहे. प्रवाशांशी मूलभूत मराठीत संवाद साधता यावा, हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीची मागणी
मुंबई आणि परिसरात सुमारे ५.५ लाख रिक्षा आणि हजारो टॅक्सी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील चालकांचा विचार करून प्रशासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी आणि योग्य व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी केली.
