मुंबईतल्या वरळी सी फेस या ठिकाणी भरधाव वेगात धावणाऱ्या कारने एका महिलेला धडक दिल्याने रविवारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता वरळीतल्या जॉगर्स आणि रनर्स यांनी वरळी पोलीस ठाण्यात आंदोलन पुकारलं. राजलक्ष्मी राजकृष्णन असं अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. वरळी दूध डेअरीजवळ ही महिला चालत होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध वरळीतल्या जॉगर्स आणि रनर्सनी नोंदवला आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
नेमकी काय घडली घटना?
राजलक्ष्मी राजकृष्णन या वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला चालत होत्या. त्यावेळी तेथे भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामळे कार या महिलेला धडकली. त्यानंतर गाडी तेथील दुभाजकालाही धडकली. कार या महिलेला मागून धडकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महिला दूरवर फेकली गेली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.




चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
याप्रकरणी चालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुमेर मर्चंट (२३) असे आरोपी कार चालकाचे नाव असून तो ताडदेव येथील रहिवासी आहे. त्यालाही अपघातात दुखापत झाली आहे. एका मैत्रीणीला सोडण्यासाठी तो गेला होता. मैत्रीणीला सोडून येताना हा अपघात झाला. त्याला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने दारूचे सेवन केले होते का ते तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. मात्र कृष्णन यांचा मृत्यू झाल्यानंतर वरळीतल्या जॉगर्स आणि रनर्स यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि वरळी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.