मुंबई : मुंबई महानरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने २ जुलै रोजी केवळ एका रात्रीत अंधेरीमधील सहार गावातील तब्बल ३१९ उंदरांचा नायनाट केला. मात्र, सहार गाव परिसरात इतक्या प्रमाणात उंदीर आढळल्याने कीटकनाशक विभागाच्या नियमित कार्यवाहीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच, मुंबईतील अन्य झोपडपट्टी परिसरांमध्येही उंदरांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याचा आरोप होऊ लागला आहे.
परिसर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. सर्व प्रशासकीय विभागांमध्ये मूषक नियंत्रणाची कार्यवाही केली जाते. नागरिकांच्या तक्रारींनुसारही घरांमध्ये मूषक सापळे लावून किंवा घराबाहेरील परिसरात बिळांमध्ये नाशक गोळ्या टाकून मूषक नियंत्रणाची कार्यवाही केली जाते. दरम्यान, महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील सहार गावात गेल्या अनेक महिन्यांपासून उंदरांचा सुळसुळाट झाला होता.
सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे परिसरात कीटकनाशक फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, पालिकेच्या के पूर्व विभागातील कीटकनाशक विभागाने २ जुलै रोजी उंदरांचा नायनाट करण्यासाठी झिंक फॉस्फाईड व सेलफॉस आणि अन्य औषध टाकले. त्यांनतर ३ जुलै रोजी पहाटे परिसरातून तब्बल ३१९ मृत उंदीर गोळा करण्यात आले. सहार गाव तुलनेने लहान असूनही तेथे मोठ्या प्रमाणात उंदीर आढळले. यावरून पालिकेच्या कीटकनाशक विभाग या परिसरात नियमितपणे कार्यवाही करीत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
मुंबईतील अन्य झोपडपट्टी परिसरातही उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा अंदाज वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त केला. अपुऱ्या कचराकुंड्या, रस्त्यांवर टाकला जाणारा कचरा, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात होणारी दिरंगाई आदी विविध कारणांमुळे उंदरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. उंदीर हा प्राणी वर्षाला चार वेळा वंशवाढ करू शकतो. त्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत वॉचडॉग फाऊंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले. उंदीर, घुशींमुळे विविध रोग होण्याची दाट शक्यता असते. ज्यात ब्युबोनिक प्लेग यासारख्या भयंकर रोगाचाही समावेश आहे. हे रोग उंदरांच्या अनियंत्रित वाढीशी संबंधित असल्याने महानगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पिमेंटा यांनी केली.
महानगरपालिकेने संपूर्ण शहरातील उंदरांच्या संख्येचा आढावा घ्यावा. तसेच, महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनात अधिक सुधारणा कराव्यात. झाकलेल्या कचराकुंड्या, कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट, सार्वजनिक ठिकाणी खरकट्या अन्नाची नियमित साफसफाई आदींवर महापालिकेने विशेष भर द्यावा, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे.