मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवर गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची घटना घडली. सुमारे चार तासांच्या शोधमोहिमेनंतर संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या दुर्घटनेत या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले. अस्लम शेख असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.

खैराणी मार्गावर खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी रस्ता रोधक उभारण्यात आले नव्हते. त्यामुळे अस्लम शेख यांना उघड्या मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि तोल जाऊन ते मॅनहोलमध्ये पडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. मात्र, शेख यांचा शोध लागला नाही.

त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा घटनास्थळी कार्यरत होते. शोध मोहिमेदरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शेख यांना बाहेर काढले.

शेख यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले. दरम्यान, रस्त्यावर नेमके काय काम सुरू होते, याबाबत महानगरपालिकेलाच माहिती नव्हती, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. साकीनाका परिसरातील मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्यामुळे उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, प्रशासनाच्या कारभारावर मुंबईकरांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात महापूर रितू तावडे यांनी पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळीही त्यांच्या डोळ्यादेखत महापालिका अधिकारी उघड्या गटारात पडला. त्यानंतर आता पुन्हा मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याने सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठत आहे.