मुंबई: साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कंत्राटदार फरार आहे. कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्याच्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला.
मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याची कार्यवाही सुरू असताना कंत्राटदराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे सकृत दर्शनी दिसून होते. त्याचवेळी रस्त्यावरून असलम इसाक शेख (५५) हे मोबाइलवर बोलत पायी जात होते. शेख मॅनहोलजवळ आले असता तेथे कामासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांचा तोल जाऊन ते मॅनहोलमध्ये पडले. या दुर्घटनेमुळे पालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.
या प्रकरणात कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयाने पोलिसात तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची व कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. जाळी लावण्याचे काम सुरू असताना सुरक्षेची जबाबदारी कंत्राटदार आणि त्याचे कामगार आणि सुपरवायझर यांची असते. मात्र या दुर्घटनेच्यावेळी मॅनहोलजवळ बॅरिकेड्स, ट्रायपॉड नव्हते, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
कार्यादेश दिले नव्हते
दरम्यान, हे मॅनहोल का उघडले, कोणाच्या आदेशाने उघडले याची चौकशी होईल असे अतिरिक्त आयु्क्त अविनाश ढाकणे यांनी प्रसारमाधम्यांशी बोलताना सांगितले. पावसाळ्याच्या आधी मुंबईतील सर्व मॅनहोलची तपासणी करून तुटलेली झाकणे बदलण्यात येतील. विभाग कार्यालयांना तसे आदेश दिले जातात, काम पूर्ण केल्याचा अहवाल घेतला जातो. तसा अहवाल यावेळीही घेतला होता. साकीनाका येथील मनुष्य प्रवेशिकेबाबत कोणी आदेश दिले होते, कोणतेही कार्यादेश दिले नसताना ते का उघडले याची चौकशी होईल, असेही ढाकणे यांनी सांगितले.
