मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून मुंबई-सावंतवाडी दैनंदिन एक्स्प्रेसच्या उद्घाटन फेरीमुळे गुरुवारी मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वे सेवेला फटका बसला. उद्घाटन सोहळा फलाट क्रमांक १८ वर सुरू राहिल्याने या फलाटावरील काही एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या गाड्या अन्य फलाटांवर वळविण्यात आल्या. जलद उपगनरी रेल्वेगाड्यांना धीम्या मार्गावरून चालविण्यात आल्याने उपनगरी रेल्वेसेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
धीम्या मार्गावरील उपनगरी रेल्वेगाड्या बराच वेळ विलंबाने धावत होत्या. १० ते २० मिनिटे वाट पाहिल्यानंतरही उपनगरी रेल्वेगाड्या स्थानकात येत नसल्याने, प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच, काही उपनगरी रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकाच्या ३० ते ५० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे महत्त्वाच्या स्थानकासह अनेक धीम्या मार्गावरील स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.
उपनगरी रेल्वेगाड्यांना विलंब झाल्याने कार्यालयीन प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. दररोज विविध कारणाने गाड्या उशिराने धावत असल्याने, कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावत असल्याने, त्याचा परिणाम उपनगरी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
तुडुंब गर्दीत प्रवास
मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या दिवसभरातील एकूण प्रवाशांपैकी सकाळी आणि सायंकाळी ८३ टक्के प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या लोकल नियोजित वेळेच्या २५ ते ३० मिनिटे विलंबाने लोकल धावल्याने, सकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये शिरणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागला. काही प्रवाशांनी जीव धोक्यात घालून लोकलने प्रवास केला. कसारा, आसनगाव, टिटवाळा, खोपोली, कर्जत, बदलापूर, कल्याण, ठाणे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकात गर्दी झाली होती. सायंकाळच्या सुमारास देखील लोकल उशिराने धावत असल्याने, प्रवाशांना धक्काबुक्की करून प्रवास करावा लागला.
