मुंबई : समुद्राच्या पातळीत वाढ होऊन या शतकाच्या अखेरीस मुंबई शहराचा काही भाग कायमस्वरूपी पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात समुद्राच्या पाण्यात वाढ झाल्यास मुंबईतील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे. तसेच एकदंरीतच याचा शहरावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे. याआधी देखील पालिकेने अशाप्रकारचे मूल्यांकन केले होते. मागील पाच वर्षातील हे दुसरे मुल्याकंन आहे.

नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा मुंबई शहराला धोका असल्याने नमूद करण्यात आले आहे. यासाठी पालिकेकडून संभाव्य हवामान बदलाचे धोके लक्षात घेऊन मुंबईच्या १४९ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचे आरेखन केले जाणार आहे. तसेच कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे, जमिनीच्या वापरात झालेले बदल, किनारी प्रदेशात होणारा विकास आणि बदलत्या हवामानामुळे शहराला असणाऱ्या धोक्यांमध्ये झालेले बदल अशा सर्व मुद्द्यांचा यात परीक्षण केले जाणार आहे. हा अहवाल पुढच्या वर्षी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

मागील पाच वर्षात मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) उभा राहिला असून यासाठी समुद्रात १०० हेक्टरहून अधिक क्षेत्रात भरणी घालण्यात आली. तसेच शहराच्या पूर्व किनारपट्टीभागात मिठागरांच्या जागांवर नव्याने विकास प्रकल्प होऊ घातले आहेत. तसेच एकंदरीतच मुंबईत उपलब्ध असणाऱ्या जमिनींचा वापर करण्याची पद्धितीही बदलीली आहे, त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन मूल्यांकन करणे गरजेचे आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात जागतिक पातळीवरील समुद्राच्या पातळीत वाढ होणाऱ्या धोक्यांचा आढावा घेण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या अभ्यासात मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मुंबई किनारपट्टी प्रदेशात असणाऱ्या धोकायदायक भागात मोठ्या संख्यने नागरिक राहतात. समुद्राच्या पातळीत भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन जागतिक हवामान बदलाबरोबरच किनारी प्रदेशांना धोका असणाऱ्या स्थानिक मुद्द्यांचाही यात आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनमध्ये (एमसीएपी) किनारी प्रदेशातील पूरपरिस्थिती, वाढते प्रदूषण, हरित क्षेत्रात होणारी घट तसेच शहरात वाढणारी उष्णता आदी मुंबई शहारासाठी हवामान विषयक धोके असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालानुसार, २०५० पर्यंत मुंबई शहराचा तब्बल ८० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जागतिक तापमानवाढ आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणारी वाढ यांचा समुद्राच्या पातळीत वाढ होण्याशी संबंध असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एमसीएपीच्या २०२२ मधील अहवालात गेल्या दोन दशकांत अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात सातत्याने वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

समुद्र पृष्ठभागाचे रात्रीचे तापमान वाढले

एमसीएपीच्या अहवालानुसार, २००३ ते २०२० या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सातत्याने वाढले असून दिवसाचे तापमान ०.०२५ अंश सेल्सिअस तर रात्रीचे ०.०१९ अंश सेल्सिअसने वाढले आहे. म्हणजे साधारणपणे मागील २० वर्षात समुद्राचे दिवसाचे तापमान ०.५ अंश सेल्सिअस तर रात्रीचे ०.३८ अंश सेल्सिअसने वाढत आहे. युरोप आणि पश्चिम आशियातील वाढते तापमानही अरबी समुद्रातील तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. असे अभ्यासकांचे मत आहे.

अभ्यासकांच्या म्हण्यानुसार, मागील काही वर्षात पावसाच्या पद्धतीत बदल झाले आहेत आणि मुंबई सरासरीहून अधिक पाऊस नोंदला जात आहे. मुसळधार पाऊस आणि भरतीच्या वेळी उसळणाऱ्या उंच लाटा यामुळे मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच रस्ताही नियोजन आवश्यक असून खारफुटी आणि पाणथळ भागांचे संरक्षण आवश्यक आहे, असेही अभ्यासकांचे मत आहे.