scorecardresearch

मुंबईतील एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट

मुंबईमध्ये २०१९-२० मध्ये ४४७३ एचआयव्हीचे रुग्ण सापडले होते. तर १२६५ व्यक्तींचे एचआयव्हीमुळे मृत्यू झाला होता.

hiv deaths decline in mumbai
चार वर्षांमध्ये एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाले प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : मुंबईमधील एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत काही वर्षांपासून सातत्याने घट होत असून मागील चार वर्षांमध्ये एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहे.

मुंबईमध्ये २०१९-२० मध्ये ४४७३ एचआयव्हीचे रुग्ण सापडले होते. तर १२६५ व्यक्तींचे एचआयव्हीमुळे मृत्यू झाला होता. २०२०-२१ मध्ये जगभरामध्ये करोनाने थैमान घातले होते. या कालावधीमध्ये चाचण्या करणे, शिबिर घेणे, रुग्णांशी संपर्क साधणे यावर मर्यादा आल्याने एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२०-२१ मध्ये मुंबईमध्ये २०६३ इतके रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यूमध्येही काही प्रमाणात घट झाली असून, ११५८ जणांचा मृत्यू झाला. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा चाचण्या करण्यास, रुग्णांशी संपर्क साधण्यास विनाअडथळा सुरूवात झाली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये मुंबईमध्ये ३०८७ इतके रुग्ण सापडले. २०१९-२० च्या तुलनेत ही संख्या जवळपास १४०० ने कमी असल्याने सोसायटीकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमांना यश मिळत असल्याचे दिसून आले. तसेच मृत्यूच्या संख्येतही २०१९-२० च्या तुलनेत तुरळक घट झाली. एचआयव्ही रुग्णांच्या व मृत्यूच्या संख्येत घट होण्याचे प्रमाण २०२२-२३ मध्येही कायम राहिले आहे. २०२२-२३ मध्ये मुंबईमध्ये १९१० एचआयव्ही रुग्ण सापडले तर ६५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

एचआयव्हीचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपाययोजना करण्याबरोबरच आम्ही मृत्यू रोखण्यासाठीही प्रयत्नशील आहोत. एचआयव्हीचे मृत्यू रोखण्यासाठी रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा करणे, त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणे, सामाजिक संस्था, एनजीओच्या माध्यमातून उपाययोजना करत आहोत. यामुळेच मागील काही वर्षांपासून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.

– डॉ. विजयकुमार करंजकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी

एचआयव्ही रुग्णसंख्या व मृत्यू

वर्ष             रुग्ण मृत्यू

२०१९-२० ४४७३ १२६५

२०२०-२१ २०६३ ११५८

२०२१-२२ ३०८७ १२४५

२०२२-२३ १९१० ६५४

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 03:50 IST