इंडियन मुजाहिदीचा दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर यांना गुरुवारी विशेष मोका न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत दहशतवादविरोधी पथकाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यासिन भटकळ आणि अख्तर या दोघांना गुरुवारी कडेकोट सुरक्षेत मुंबईतील विशेष मोका न्यायालयात आणण्यात आले होते. १३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये भटकळ आणि अख्तर यांचाच हात होता. त्याच्या चौकशीसाठी या दोघांना दहशतवादविरोधी पथकाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत दादर कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार याठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १२७ जण जखमी झाले होते. या स्फोटांसाठी आयईडी तयार करण्यात भटकळ आणि अख्तर या दोघांचाही हात होता, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.