सेरो सर्वेक्षण : दुसऱ्या लाटेत संसर्ग झाल्याचा अंदाज

मुंबई : मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये करोना प्रतिपिंडे आढळली आहेत. याचाच अर्थ करोना साथीच्या दुसऱ्या लाटेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांना संसर्ग झाला होता. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणातील हा निष्कर्ष आहे.

करोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यात लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लहान मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांचे (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त  इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्यात मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये करोना प्रतिपिंडे (अ‍ॅण्टीबॉडीज) विकसित झाल्याचे आढळले. यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत प्रतिपिंडे आढळलेल्या मुलांची संख्या जास्त असल्याने ही बाब समाधानकारक मानली जाते.

महापालिकेच्या नायर आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळांनी १ एप्रिल ते १५ जून २०२१ दरम्यान लहान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण के ले. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्याकरीता संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये १८ पेक्षा कमी वयाच्या ३९.०४ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती. त्या तुलनेत आता प्रतिपिंडे असलेल्या मुलांची संख्या / टक्केवारी वाढली आहे. याचाच अर्थ असा आहे की, दुसऱ्या लाटे दरम्यानच १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना करोनाचा संसर्ग झाला होता.

अडीच हजार रक्त नमुने

मुंबई महापालिकेचे सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून एकूण २,१७६ अनोळखी रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या आपली चिकित्सा वैद्यकीय प्रयोगशाळांच्या विविध शाखा आणि नायर रुग्णालय यांच्या माध्यमातून १,२८३ आणि दोन खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांतून ८९३ रक्त नमुने संकलित करण्यात आले.  हे सर्व नमुने कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीवनिदान वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.

या सर्वेक्षणातून निष्कर्ष काढण्यासाठी नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या गृहअधिकारी डॉ. गार्गी काकाणी यांनी मुख्य अन्वेषक म्हणून तर, सहमुख्य अन्वेषक म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. जयंथी शास्त्री यांनी कामकाज सांभाळले. तसेच नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील प्राध्यापक डॉ. सुरभी राठी आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सची अग्रवाल यांनी सह अन्वेषक म्हणून काम पाहिले.

करोना संसर्गापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी त्यांना आरोग्य शिक्षण देणे, वर्तणुकीबाबत जनजागृती करणे, विशेषत: समाज माध्यमांचा वापर व्यंगचित्रे, जिंगल्सद्वारे मुलांना माहिती देणे इत्यादी सूचनाही सर्वेक्षणात करण्यात आल्या आहेत.

वयोगटानुसार प्रमाण

वयोगट – प्रतिपिंडे आढळलेली बालके  (टक्क्य़ांमध्ये)

१ ते ४  –     ५१.०४

५ ते ९ –     ४७.३३

१० ते १४ –  ५३.४३

१५ ते १८ –  ५१.३९

सरासरी —-५१.१८

प्रमुख नोंदी

*मुंबईतील ५१.१८ टक्केमुलांमध्ये प्रतिपिंडे

*पालिकेच्या प्रयोगशाळांतील ५४.३६ टक्के, तर खासगी प्रयोगशाळांतील ४७.०३ टक्के नमुन्यांत प्रतिपिंडे.

*१० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे.