मुंबई : मुंबई महानगरपालिकेने कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील (शताब्दी रुग्णालय) रक्तपेढी सार्वजनिक खासगी तत्त्वावर (पीपीपी) चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. याला विविध स्तरावरून विरोध करण्यात येत आहे. मात्र शताब्दी रुग्णालयातील रक्तपेढीच्या रक्तसंकलनात मागील तीन वर्षांत सातत्याने घट होत आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ४३ टक्क्यांनी घट झाली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या रक्तपेढीने २०२२-२३ मध्ये १ हजार ७४६ रक्त पिशव्यांचे संकलन केले होते. या रक्तपेढीत २०२३-२४ मध्ये १ हजार ४२०, २०२४-२५ मध्ये ६९७ आणि २०२५-२६ मध्ये ९९२ रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. तीन वर्षांच्या कालावधीत रक्तसंकलनात ७५४ युनिट्सची घट झाली असून ती सुमारे ४३ टक्के इतकी आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन्ही महिन्यांत रक्तपेढीने केवळ २५-२५ रक्तपिशव्यांचे संकलन केले. शताब्दी सारख्या मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या अधिक असताना रक्तपेढीकडून रक्त संकलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भगवती रुग्णलयातून २०१६ मध्ये शताब्दी रुग्णालयामध्ये रक्तपेढी स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी रक्तघटक विभाजनासह रक्तपेढी चालविण्यासाठी साधारण १५० चौरस मीटर जागेची आवश्यकता असताना मुंबई महानगरपालिकेने शताब्दी रुग्णालयामध्ये २२६.४९८ चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र या जागेचा बराचसा भाग वापराविना पडून आहे.
रक्तपेढीसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी आणि एक डॉक्टर कार्यरत असतानाही रक्तपेढी सकाळी १० ते सायंकाळी ५ या एका पाळीत चालविली जात असून, हे दोन्ही अधिकारी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी रक्तपेढीची सेवा बंद ठेवतात. त्याचप्रमाणे या रक्तपेढीमध्ये रुग्णालय प्रशासनाकडून दोन तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून, ते रक्तपेढीऐवजी प्रयोगशाळेमध्ये काम करत आहेत. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्य सरकारने २०१४ मध्ये रक्तपेढीसाठी सुमारे पाच लाख रुपयांचा रेफ्रिजरेटर (शीतपेटी) दिला आहे. त्याच्या देखभालीवर मोठा खर्च केला जात आहे. तसेच हिमोग्लोबिन तपासणीसाठी तुलनेने स्वस्त कॉपर सल्फेट पद्धतीऐवजी हेमोक्यू पद्धतीचा वापर केल्यामुळे प्रत्येक रक्तदात्यामागे अतिरिक्त खर्च होत आहे.
पुरेशी जागा, कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि अत्याधुनिक यंत्रणा असतानाही रक्तपेढीकडून रक्त संकलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी अन्य रुग्णालयातील रक्तपेढ्यांकडे किंवा खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
