मुंबईः शिवसेनेतील फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच इथे मुंबईत मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याची छायाचित्रे चर्चेत आली आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. या सहा खासदारांमध्ये ईशान्य मुंबईतील खासदार संजय दीना पाटील यांचाही समावेश आहे. पाटील यांच्या बंडाच्या चर्चेनंतर त्यांची नगरसेविका कन्या राजोल पाटील आता काय भूमिका घेणार याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. राजोल यांनी पक्ष सोडलेला नाही आणि पक्षानेही त्यांची हकालपट्टी केलेली नाही. मात्र, राजोल पाटील नुकत्याच शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने ठाकरे गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभादेवीत एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमाला त्या संजय पाटील यांच्या सोबत आणि कुटुंबासोबत उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

संजय पाटील यांच्या बंडानंतर राजोल पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती व त्यानंतर आपण पक्षासोबत आहोत व ठाकरे परिवारासोबतच आहोत अशी भूमिका मांडली. मात्र राजोल यांची पक्षनिष्ठा आहे की अपरिहार्यता आहे याचीही चर्चा सुरु झाली होती. त्या पक्षाच्या कार्यक्रमांना हजर राहत असल्या तरी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कार्यक्रमालाही हजर राहिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

ठाकरे गटाच्या पालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या उपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाने यावर ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुंबईच्या राजकारणात आणखी एका मोठ्या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील संघटनात्मक जबाबदारी सचिन अहिर यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर सोमवारी त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांशी विधान भवनात संवाद साधला.

या बैठकीत सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर हे देखील उपस्थित होते. त्यामुळेही चर्चा रंगू लागली आहे. सुनील अहिर हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बेस्ट समितीवरील स्वीकृत सदस्य आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडून सुनील अहिर यांची बेस्ट समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर सुनील अहिर हे देखील शिंदे गटात प्रवेश करतील किंवा ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सध्या तरी ते ठाकरे गटाच्या कोट्यातून बेस्ट समितीवर सदस्य म्हणून कायम आहेत. परंतु, सुनील अहिर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आता राजकीय चर्चा सुरू आहे.

राजोल पाटील आणि सुनील अहिर यांच्या शिंदे गटाशी वाढलेल्या संपर्कामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून महापालिकेतही नगरसेवकांमध्ये फूट पाडणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे.