मुंबई: उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी बांधण्यात आलेल्या गझिबोजे छप्पर बुधवारी सायंकाळी अचानक कोसळले. या दुर्घटनेत पाच वृद्ध इसम जखमी झाले असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शीव येथील प्रतीक्षा नगर परिसरात पालिकेचे माला उद्यान असून या उद्यानात बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या उद्यानात नागरिकांना विश्रांती घेता यावी यासाठी काही वर्षांपूर्वी गझिबो बांधण्यात आले होते. उद्यानात येणारे नागरिक या गझिबोमध्ये बसत होते. बुधवारी सायंकाळी उद्यानात आलेले काही वृद्ध गझिबोमध्ये बसले होते. याच वेळी अचानक गझिबोचे छप्पर कोसळले आणि त्याखाली वृद्ध अडकले. ही बाब उद्यानातील इतर नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वृद्धांना बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले. या दुर्घटनेत धोंडीराम खोपकर (६५), गणपत आंबोले (७९), प्रमिला जाधव (६८), लक्ष्मी शितलीय (६५) आणि सुनीता मोरे (६५) हे पाच वृद्ध जखमी झाले. जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.