मुंबई : येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. पुनर्विकास हा मुंबईसाठी नवा मंत्र आहे. म्हाडा तसेच झोपु समूह पुनर्विकासाद्वारे मुंबईचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. याबाबत आराखडा तयार आहे. सध्या मुंबईतील तिसरे विमानतळ विरार येथे उभे केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) महाराष्ट्रच्या रिअल इस्टेट परिषदेत गुरुवारी जाहीर केले.‘नरेडको महाराष्ट्र नेक्स्ट जेन’च्या नव्या अध्यक्षपदाची सूत्रे रौनक बांदेलकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वीकारली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सध्या सागरी महामार्ग भाईंदरपर्यंत व तेथून विरारपर्यंत नेला जाणार आहे.
मुंबईतील तिसरे विमानतळ विरार येथे स्थापन केले जाणार आहे. विरार-अलीबाग कॅारिडॅार, बुलेट ट्रेन, मुंबई -दिल्ली कॅारिडॅार आदींमुळे आम्ही चौथ्या मुंबईची तयारी करीत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाढवण येथे जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा तीन पट मोठे बंदर उभे केले जात आहे. आज देशभरातील ७० टक्के कंटेनर्स न्हावाशेवा पोर्ट हाताळत आहे. परंतु जगातील सर्वांत मोठी बोट या बंदरावर उभी राहू शकत नाही. परंतु वाढवण बंदरात अशा महाकाय बोटीही उभ्या करता येणार आहेत.
जगातील पहिल्या दहा बंदरात वाढवणचा क्रमांक असेल, अशा रीतीने बंदर उभे राहत आहे. वाढवण बंदरामुळे पालघरमधील दहा लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय मालवाहतुकीला वाहिलेला मार्ग आपल्याला तयार करावयाचा आहे. वाढवण ते जेएनपीटी, तेथून नाशिक, वर्धा आणि अगदी गडचिरोलीपर्यंत असा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा मार्ग न्यायचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील बेस्टच्या सर्व आगारांचा पुनर्विकास केला जाणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतीलच. याशिवाय वाहतूक व्यवस्थाही अत्युच्च दर्जाची असेल. आम्ही जो आराखडा आखला आहे, त्यामुळे पुढील दहा वर्षांत मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
धारावीत २०२८ पर्यंत दहा हजार घरे
धारावी पुनर्विकासात प्रकल्पात २०२८ पर्यंत पुनर्वसनातील दहा हजार घरे तयार होणार आहेत. जानेवारी २०२९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धारावीतील रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याचा विकासदर ८.८ टक्के!
देशाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ७.८ टक्के असताना महाराष्ट्राने याच कालावधीत ८.८ टक्के विकासदर नोंदविला आहे. या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरार-उत्तन सर्वात मोठा सागरी सेतू
शिवडी-न्हावा शेवा हा अटल सेतू आतापर्यंत सर्वांत मोठा (२२ किमी) होता. विरार-उत्तन हा २४ किमीचा सर्वात मोठा सागरी सेतू तयार करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा २०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. एमएमआरमध्ये भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता विकसित होत असून, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि डीप टेकचे परिसंस्थाही येथे विकसित करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मुंबई ३’ आता प्रत्यक्षात!
‘मुंबई ३’ ही केवळ भविष्यातील संकल्पना नसून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी, एज्यु-सिटी, मेडि-सिटी आणि इनोव्हेशन सिटीसह विविध नागरी केंद्रे विकसित होत आहेत. मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान आणि सिग्नलमुक्त करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
