मुंबई : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांकडून खरेदी केलेली झोपडी नावावर होत नसल्याने अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागते. प्रकल्पास विलंब होतो. या पार्श्वभूमी राज्य सरकारने झोपड्यांच्या हस्तांतरणासाठी, झोपडी खरेदी केलेल्यांचे नाव परिशिष्ट-२ मध्ये समाविष्ट करण्यासाठी अभय योजना आणली आहे.
या अभय योजनेअंतर्गत अधिकाधिक झोपडीधारकांनी सहभागी होत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विशेष मोहिम सुरु केली आहे.या मोहिमेला सुरुवात झाली असून महिनाभर ही मोहिम सुरु राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईत दहा ठिकाणी शिबिर लावण्यात आले आहेत.
या शिबिरात सहभागी होत कागदपत्रे जमा करुन घेत झोपडीधारका्ंना हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करुन घेता येणार आहे. झोपु प्राधिकरणाच्या कार्यालयात यासाठी जाण्याची गरज नाही. त्यामुळे झोपडी खरेदी-विक्री व्यवहार केलेल्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
म्हणून अभय योजनेला मुदतवाढ
झोपु योजनेतील पात्र झोपडीधारक अर्थात परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट असलेले झोपडीधारकच पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी पात्र ठरतात. अशात मुंबईत अनेक झोपु योजना विविध कारणांने रखडल्या आहेत. या रखडलेल्या झोपु योजना मार्गी लावण्याची जबबादारी म्हाडा, महाप्रित, मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडकोसारख्या सरकारी यंत्रणांवर टाकण्यात आली आहे.
तेव्हा या योजनातील पात्रता निश्चिती योग्यप्रकारे पूर्ण होऊन प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी रखडलेल्या योजनेतील खरेदी-विक्री केलेल्या झोपडीधारकांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. आॅक्टोबर २०२४ मध्ये तीन महिन्यांसाठी ही अभय योजना लागू करण्यात आली होती. मात्र या योजनेची माहिती झोपडीधारकांपर्यंत न पोहचल्याने त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे मार्च २०२५ मध्ये या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. झोपु योजना रखडत असल्याने, परिशिष्ट -२ तयार झाल्यानंतरही वर्षानुवर्षे योजना सुरु होत नसल्याने अनेक जण झोपड्या विकतात. पात्र झोपडीधारकाने घर विकल्यानंतर घर खरेदी केलेल्याचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट होत नाही, तशी तरतूद नाही. त्यामुळे झोपडी खरेदी केलेले झोपडीधारक झोपु योजनेत खोडा घालतात, पाडकाम अडवतात, न्यायालयात जातात. परिणामी झोपु योजनांना विलंब होतो. ही बाब लक्षात घेता अभय योजना आणण्यात आली आहे.
दहा ठिकाणी शिबिर
अभय योजनेनुसार १ जानेवारी २०११ पूर्वी झोपडी खरेदी केलेल्यांना आणि रखडलेल्या योजनेतील झोपडीधारकांचा या योजनेचा लाभ घेता येईल. दरम्यान या अभय योजनेची माहिती झोपडीधारकांपर्यंत पोहचत नसल्याने झोपु प्राधिकरणाने आता विशेष मोहिम हाती घेतल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.या विशेष मोहिमेअंतर्गत दहा ठिकाणी शिबिर लावण्यात आले आहेत.
या शिबिरात सहभागी होत खरेदी-विक्री केलेल्या झोपडीधारकांना कागदपत्रे जमा करता येतील. महिनाभर हे शिबिर सुरु राहणार असून या शिबिरात अधिकाधिक झोपडीधारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे. या शिबिरात जमा झालेल्या अर्जांची, कागदपत्रांची छाननी करत पात्र झोपडीधारकांच्या नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.