मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामानिमित्त राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागादरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गाच्या सर्व चार मार्गांवर ताशी ३० किमी वेगमर्यादा लावण्यात आली आहे. वेगावरील निर्बंध २ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असल्याने, पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा कुर्मगतीने धावेल.
नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी राम मंदिर – गोरेगाव – मालाड स्थानकांदरम्यान ३० सप्टेंबरपासून लोकलच्या वेगावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अप आणि डाऊन जलद मार्गांवर हे वेग प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. वेगाचे निर्बंध २ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत लागू राहतील. त्यामुळे १५० लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर, अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वेगमर्यादा ४ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत चालवण्यात येईल. गोरेगाव ते कांदिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गाचे काम या आठवड्याच्या शेवटी पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी शेवटचा आणि अंतिम मोठा ब्लॉक लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई : सीएसएमटीच्या २० लोकल दादरवरून धावणार
हेही वाचा – मुंबई : गोखले पुलावरील आडवे खांब हटणार, अवजड वाहने जाऊ शकणार ?
गोरेगाव स्थानकादरम्यान १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मोठा ब्लॉक घेतला जाईल. तर, रात्री २ ते रात्री ३.३० वाजेपर्यंत सर्व मार्गावर ब्लॉक असेल. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामामुळे बोरिवली आणि अंधेरी दरम्यान रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत धीम्या मार्गावरून सर्व जलद लोकल चालविण्यात येणार आहेत.