मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) योजनांमध्ये बनावट नावे घुसडली जात असून सध्या सुरू असलेल्या सर्व झोपु योजनांची एसआयटीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे चारकोप येथील आमदार योगेश सागर यांनी शुक्रवारी विधासभेत केली. पुण्यातील गोसाई वस्तीच्या झोपु योजनेत अपात्र झोपडपट्टीधारकांना घुसविण्यात आल्याचा विषय लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडण्यात आला. त्यावेळी चर्चेत सहभागी होत मुंबईत झोपु योजनेत सुरू असलेल्या घोटाळ्यांना सागर यांनी वाचा फोडली.
मुंबई महापालिकेच्या एका जमिनीवर अवैधपणे १८८ गाळे बांधण्यात आले. त्याचे बनावट परिशिष्ट दोन बनविण्यात आले. या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर पाहणी करण्याकरिता गेलो असता तिथे अटकाव करण्यात आला. अखेर पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता या ठिकाणी जाता आले, असा अनुभव सागर यांनी सांगितला.
या योजनेतील बनावट परिशिष्ट आता रद्द करण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणात एकाही दोषी पालिका किंवा झोपु अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही, असा आरोप सागर यांनी केला.
केवळ याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण मुंबईभर हा प्रकार मोकाटपणे सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत जितके झोपु प्रकल्प सुरू आहेत, त्यांमधील झोपडपट्टीधारकांची पात्रता ज्या परिशिष्टाच्या माध्यमातून निश्चित केली जाते, त्याची चौकशी एसआयटीकडून करण्यात यावी, अशी मागणी सागर यांनी केली.
संरक्षण विभागाच्या, केंद्राच्या जमिनींचा प्रश्न
संरक्षण विभागाच्या जमिनींवर झोपु योजना करता येत नाही. परंतु, या जमिनीवर राहणाऱ्या लोकांनाही झोपु योजनेत घर मिळाले पाहिजे, याबाबत राज्य सरकार काय करणार, असा प्रश्न राम कदम यांनी केला. त्यावर, संरक्षण, हवाई दलाच्या, केंद्राच्या जमिनीवरील झोपु योजनांमध्ये अडचणी येतात. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने खासदारांच्या सर्वपक्षीय बैठकीत हा विषय प्राधान्यक्रमाने घेण्याची विनंती मुख्यमंत्री कार्यालयाला करण्यात आली आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
