मुंबई : मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना मान्यता देताना आता ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’कडून विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. अशा योजनांमध्ये साडेचार फूट मोकळी जागा सोडणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अशा योजनांना मंजुरी देताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मोकळ्या भूखंडावर झोपु योजना मंजूर करताना प्राधिकरणाकडून अधिकारांचा गैरवापर होत असून अशा ३०० हून अधिक योजना असल्याचे पत्र महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला लिहिल्यामुळे खळबळ माजली होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसारच मोकळ्या भूखंडावरील झोपु योजनांना परवानगी देण्यात आल्याचे याबाबत झोपु प्राधिकरणाने या वृत्तानंतर स्पष्ट केले होते. या बाबत अद्याप नगरविकास विभागाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र झोपु प्राधिकरणाने अशा योजनांना द्यावयाच्या मंजुरी प्रक्रियेत कठोरता आणली आहे. प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर याबाबत दुजोरा दिला.
विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(१०) नुसार झोपडपट्टीचा तर ३३(११) नुसार मोकळ्या भूखंडांचा पुनर्विकास केला जातो. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण नियोजन प्राधिकारी असून या अंतर्गत चार इतके चटईक्षेत्रफळ दिले जाते. यापैकी एक मूळ चटईक्षेत्रफळ वजा करुन तीनपैकी दीड चटईक्षेत्रफळाइतक्या कायमस्वरुपी संक्रमण सदनिका बांधून द्यायच्या व दीड चटईक्षेत्रफळ खुल्या विक्रीसाठी उपलब्ध होते. झोपु योजनेत विकासकांना अधिमूल्यात सवलत आहे. मात्र तो लाभ ३३(११) मधील योजनांना लागू नाही. तरीही तो लाभ झोपु प्राधिकरणाकडून दिला जात असल्याकडे पालिका आयुक्तांच्या पत्रात लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत पहिल्यांदा तत्कालीन पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी आक्षेप घेतल्यानंतर झोपु प्राधिकरणाला ३३(११) ही नियमावली फक्त झोपु योजनेसोबतच संलग्न करता येईल, असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले होते. मात्र या आदेशांचे झोपु प्राधिकरणाकडून पालन होत नसल्याची बाबही निदर्शनास आणण्यात आली होती. या पत्रानंतर झोपु प्राधिकरणाने मात्र मोकळ्या भूखंडावरील झोपु योजनांबाबत सावध भूमिका घेतली आहे.
३३ (११) या नियमावलीमुळे कुठल्याही प्रकारच्या अधिमूल्यात कपात झालेली नाही वा सवलत देण्यात आलेली नाही. उलटपक्षी योजना संलग्न करताना अनर्जित रक्कम आकारली जाते तसेच संक्रमण सदनिकांची अन्य योजनांत अदलाबदल करतानाही वार्षिक मुल्य दरानुसार अधिमूल्य आकारले जाते. याशिवाय पायाभूत सुविधा शुल्क, विकास शुल्क, मोकळी जागेत सवलत देणे तसेच फंजीबल चटईक्षेत्रफळ देताना निवासी घरांसाठी वार्षिक मूल्य दराच्या ५० टक्के तर अनिवासी घरांसाठी ६० टक्के अधिमूल्य आकारले जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे चटईक्षेत्रफळ मोफत दिले जात नाही, असे झोपु प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
