मुंबई : व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) राज्यात ४० मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सीईटी कक्षाच्या माध्यमातून उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर १५ दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ मधील तरतुदींनुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. प्रवेश परीक्षा व प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यांवर विद्यार्थी, पालक किंवा हितसंबंधित घटकांकडून अनेक तक्रारी येत असतात.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासंदर्भात प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कार्यपध्दतीबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवेशासंबंधीची कोणतीही तक्रार प्राधिकरणासमोर दाखल करता येईल व १५ दिवसांच्या आत व प्रवेशाच्या अंतिम दिनांकापूर्वी त्यावर निर्णय घेण्यात येईल. तसेच अधिनियम २०१५ च्या कलम ९ (२) (एक) व (दोन) व कलम ५ (५) नुसार याबाबत विनियम निश्चित करून प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. सीईटी कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समितीने अधिनियम २०१५ नुसार १ ऑक्टोबर २०२५ च्या विनियमामध्ये दिलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करावा असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

अशी आहे समिती

प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अवर सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच संबंधित संचालनालयाचे प्रतिनिधी (वर्ग २ च्या पदापेक्षा कमी दर्जाचा नसावा), प्रवेश नियामक प्राधिकरणचे कक्ष अधिकारी सदस्य असणार आहेत. तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील संबंधित विभागाचे परीक्षा समन्वयक सदस्य सचिव असणार आहेत.