हवाईक्षेत्रामुळे उंची वाढवण्यावर मर्यादा; शेकडो इमारतींना फटका

उपनगरातील म्हाडा तसेच खासगी इमारतींच्या पुनर्विकासात हवाईक्षेत्रामुळे इमारतीच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि पालिकेने चटईक्षेत्रफळाच्या वापरावर अनेक वर्षांपूर्वी टाकलेली मर्यादा हा प्रमुख अडसर असल्यामुळे पुनर्विकास पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हाडा तसेच खासगी असलेल्या शेकडो इमारतींना फटका बसणार आहे. याबाबत काय करता येईल, याचा विचार सुरू करण्यात आला आहे. म्हाडानेही या दिशेने धोरणात काही सुधारणा करता येईल का, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

अंधेरी ते सांताक्रूझ या विमानतळ परिसरापासून चार किलोमीटर अंतरावर हवाई क्षेत्र घोषित आहे. या परिसरात पंधरा मजल्यापर्यंत म्हणजे ५१ मीटपर्यंत इमारतीच्या उंचीस परवानगी देण्यात येते. त्यामुळे चटईक्षेत्रफळ उपलब्ध असले तरी ते वापरता येत नाही. अशा वेळी या अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचे ‘विकास हक्क हस्तांतरा’त (टीडीआर) रूपांतर करण्याची मागणी विकासकांकडून केली जात आहे; परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. म्हाडाने मात्र आपल्या हद्दीतील वसाहतींबाबत धोरणात सुधारणा व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अलीकडेच सुधारित धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार चार हजार किंवा त्यापेक्षा अधिक चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर चार इतके चटईक्षेत्रफळ देण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी एक इतक्या चटईक्षेत्रफळाचे बांधकाम करून घरे म्हाडाच्या ताब्यात द्यावयाची आहेत. ही घरे विकासकांकडून म्हाडा विकत घेणार आहे. मात्र अंधेरी ते सांताक्रूझ या विमानतळ परिसरात येणाऱ्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात संपूर्ण चटईक्षेत्रफळ उंचीच्या मर्यादेमुळे वापरता येणार नाही. त्यामुळे ही घरे बांधून देणे शक्य होणार नाही, असे विकासकांचे म्हणणे आहे. खासगी इमारतींच्या पुनर्विकासातही तोच अडसर आहे. खासगी इमारतींना दोन इतके चटईक्षेत्रफळ लागू आहे; परंतु खासगी इमारतींभोवतालचा परिसर मोठा असल्यास या ठिकाणीही उंचीच्या मर्यादेमुळे संपूर्ण चटईक्षेत्रफळ वापरण्यात अडचण येत आहे.

विमानतळ परिसरवगळता उपनगरातील अन्य ठिकाणी असलेल्या म्हाडाच्या वसाहती तसेच खासगी इमारतींच्या पुनर्विकासात उंचीचा अडसर नसला तरी महापालिकेने चटईक्षेत्रफळाबाबत आखून दिलेल्या मर्यादेचा अडसर आहे. एका इमारतीच्या पुनर्विकासात चटईक्षेत्रफळ वापराची मर्यादा ३.५ इतकी आहे. अनेक म्हाडा वसाहतींच्या समूह पुनर्विकासात ही मर्यादा अडसर ठरत आहे. म्हाडा वसाहतींना प्रत्येक रहिवाशामागे प्रोरेटा (अतिरिक्त) चटईक्षेत्रफळ मिळते. त्याचा वापर केल्यास चटईक्षेत्रफळाचा मर्यादा ३.५ पेक्षा अधिक होते; परंतु पालिकेकडून त्यास मान्यता मिळत नाही. रहिवाशांना त्यांनी मागितलेले क्षेत्रफळ देऊन खुल्या विक्रीसाठी घरे बांधण्यासाठी विकासकांना ३.५ पेक्षा अधिक चटईक्षेत्रफळाची आवश्यकता आहे. परंतु त्यास पालिकेकडून मर्यादा असल्यामुळे या वसाहतींचा पुनर्विकास पुन्हा रखडणार आहे. खासगी इमारतींना विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) जारी करण्याचा शासनाचा विचार आहे. तसे झाल्यास खासगी इमारतींच्या समूह पुनर्विकासात ३.५ चटईक्षेत्रफळाची मर्यादा अडसर ठरणार आहे. इमारतींचा पुनर्विकास व्हावा, असे वाटत असल्यास धोरणात बदल करायला हवा, असे मत विकासक व्यक्त करीत आहे.