माहीम येथील रेल्वे अपघाताची चौकशी

शुक्रवारच्या घटनेत ६ प्रवासी जखमी, ९० लोकल फेऱ्यांना फटका

शुक्रवारच्या घटनेत ६ प्रवासी जखमी, ९० लोकल फेऱ्यांना फटका

हार्बर मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी अंधेरीला जाणाऱ्या एका लोकलचे चार डबे रुळावरून घसरले आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीतील हार्बर मार्ग पुरता कोलमडला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. तसेच ७० लोकल फेऱ्या रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर ओढवली. २० लोकल विलंबाने धावत होत्या. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला  १० तास लागले. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या अपघातामुळे प्रवाशांना  मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्ताकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

सीएसएमटी ते अंधेरीदरम्यान धावणारी लोकल शुक्रवारी सकाळी ९.५० च्या सुमारास  माहीम स्थानकाजवळच येताच ५ क्रमांकाच्या फलाटावरून ६ क्रमांकाच्या फलाटावर जाण्यासाठी लोहमार्ग ओलांडत होती. त्याच वेळी या लोकलचे चार डबे लोहमार्गावरून घसरले. डबे घसरताच मोठा आवाज झाला. त्यामुळे घाबरलेल्या काही प्रवाशांनी लोकलमधून उडय़ा मारल्या. त्यात पाच महिला आणि एक पुरुष प्रवासी जखमी झाले.  रात्री पावणेआठच्या सुमारास माहीम स्थानकाजवळील हार्बर मार्ग लोकल चालवण्यासाठी सुरक्षित असल्याची तपासणी पूर्ण होताच हार्बर सेवा पूर्ववत करण्यात आली.

भाग्यीलक कनोजीया गंभीर जखमी झाल्याने रेल्वेकडून त्यांना २५ हजार रुपये तर अन्य पाच प्रवाशांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली.

या संदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले की, अंधेरीला जाणारी लोकल माहीम स्थानकातच थांबवून ती पुन्हा सीएसएमटीसाठी चालवण्यात येणार होती. हार्बरवरील वांद्रे स्थानकाजवळच असलेल्या रोड ओवर ब्रिजवरून एका खाजगी क्लासचा बॅनर ओवरहेड वायरवर पडला होता. त्यामुळे ओवरहेड वायरला विद्युतपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. परिणामी, अंधेरीला जाणारी लोकल माहीम स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण माहीमजवळ येताच रूळ क्रॉस ओव्हरवर लोकलचे डबे घसरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai suburban train derails near mahim